TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यभर निदर्शने

मुंबई: कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर सोमवारी  राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कानपिचक्या दिल्यानंतर सत्तार यांनी रात्री सिल्लोड येथील सभेत दिलगिरी व्यक्त केली. सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन सुरू केले. बाळासाहेबांची शिवसेना गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नियोजित सभेच्या तयारीचा आढावा घेताना कृषिमंत्री सत्तार यांची जीभ घसरली. त्यांनी खासदार सुळे यांच्याबद्दल अपशब्द काढले. सत्तार यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे राज्यभर पडसाद पडले. सत्तार यांच्या वक्तव्याने समस्त महिला वर्गाचा अपमान झाला आहे. त्यामुळे सत्तार यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्याविरोधात आक्रमक आंदोलन करत त्यांना झोडपून काढू, असा पवित्रा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र पा्ठवून २४ तासांच्या आत मंत्रिमंडळातून सत्तार यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी केली. तसेच मुंबईत सत्तार यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात मागणी केली.

सत्तार यांच्या वादग्रस्त विधानानंतर पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोरील सत्तार यांच्या शासकीय निवासस्थानी धाव घेतली. तेथे कायर्कत्र्यांनी घोषणाबाजी करीत घराच्या खिडक्याच्या काचा फोडल्या. पोलिसांनी बळाचा वापर करीत कायर्कत्र्यांना ताब्यात घेतले. सत्तार यांच्या वक्तव्याचे गंभीर पडसाद उमटत असल्याचे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी सत्तार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत घडलेल्या प्रकाराबाबत दिलगीरी व्यक्त करण्याचा आदेश सत्तार यांना दिला.  सत्तार यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण देताना म्हटले  की, आम्हाला ज्या भाषेत बोलतील त्याच भाषेत आम्ही  बोलणार. प्रत्येक वेळी खोक्याची भाषा केली जाते. त्याबाबत पुरावे असेल तर आरोप करावेत. अन्यथा त्याच भाषेत आम्ही बोलणार. सत्तार यांच्या वक्तव्यावर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली.

सत्तार यांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाम आहे. महिला लोकप्रतिनिधीविषयी गलिच्छ भाषा बोलून सत्तार यांनी मागास मनोवृत्तीचे दर्शन घडवले, त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. दिवसभर सुरू असलेल्या आंदोलनानंतर आणि मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडवणीस यांच्या कानपिचक्यानंतर सत्तार यांनी रात्री दिलगिरी व्यक्त केली.  मी जे बोललो ते खोक्याबद्दल बोललो; परंतु त्याचा कोणी वेगळा अर्थ काढू नये. महिलांबद्दल मला आदर आहे. मी कोणत्याही महिला भगिनीबद्दल अपशब्द बोललो नाही; पण माझ्या बोलण्याने कोणाचे मन दुखावले असेल तर मी खेद व्यक्त करीत माझे शब्द मागे घेतो, असे म्हणत सत्तार यांनी दिलगिरी व्यक्त केली. कुठल्याही क्षेत्रातील महिलांचा सन्मान राखला पाहिजे, ही आपली संस्कृती जपलीच पाहिजे. सत्तार यांनी जे वक्तव्य केले आहे त्याबद्दल त्यांनी आपली दिलगिरी व्यक्त केली आहे, त्यांना आपली चूक कळलेली आहे, असे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button