मालेगावात वृद्ध दाम्पत्याच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ
![Mystery of the suspicious death of an elderly couple in Malegaon](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/CRIME-compressed-1.jpg)
मालेगाव येथील हिंगलाजनगर भागात गुरुवारी पहाटे अलताब हुसेन मोहम्मद सईद (७०) आणि अल्कमा अलताब हुसेन (६५) या वृध्द दाम्पत्याचे मृतदेह रहात्या घरात संशयास्पद स्थितीत आढळून आले. पतीच्या मृतदेहावर गंभीर जखम असल्याचे आणि पत्नीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने हा प्रकार हत्येचा की आत्महत्येचा याविषयी गूढ निर्माण झाले आहे.
हिंगलाज नगरमध्ये असलेल्या स्वमालकीच्या इमारतीत तळमजल्यावर हे दाम्पत्य वास्तव्यास होते. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर भाडेकरु आहे. पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास हुसेन यांच्या घरातून धूर निघत असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर गल्लीतील लोकांनी धावपळ करत तेथील आग विझवली. यावेळी घरातील एका खोलीत अल्कमा हुसेन यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आणि दुसऱ्या खोलीत अलताब हुसेन यांचा मृतदेह आढळून आला. अलताब हुसेन यांच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने मोठा रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक प्रिती सावंत या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपअधीक्षक तेगबीर सिंग संधू यांनीदेखील धाव घेत घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली.
हुसेन दाम्पत्य हे येथे एकटेच राहत होते. अभियंता असलेला त्यांचा मुलगा पुणे येथे वास्तव्यास आहे. समाज कार्यातही हुसेन दाम्पत्य नेहमी पुढे राहत असल्याचे सांगण्यात आले. दरोडा वा अन्य कारणांमुळे हत्या झाली की हा आत्महत्येचा प्रकार आहे, याविषयी सर्व पैलूंचा पोलीस अभ्यास करीत आहेत. घटनेचे गांभिर्य लक्षात घेता दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाला नसल्याचे सांगण्यात आले.