मनसेचा दबका आवाज; कार्यकर्त्यांची धरपकड, नोटिसा, तडीपारीने आंदोलन क्षीण
![MNS's dabka voice; Arrest of activists, notices, delays in agitation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/MNSs-dabka.jpg)
मुंबई | प्रतिनिधी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंग्याविरोधातील आंदोलनाचा मुंबईत म्हणावा तसा आवाज ऐकूच आला नाही. पोलिसांनी कार्यकर्त्यांची केलेली धरपकड, अनेकांना दिलेल्या नोटिसा, तडीपारीची कारवाई, महत्त्वांच्या ठिकाणी ठेवलेला कडेकोट बंदोबस्त लक्षात घेता मनसेला आक्रमक आंदोलन करता आले नाही. मुंबईत जवळपास १००हून अधिक मशिदींवर बुधवारी अजान वाजविण्यात आल्याची माहिती राज ठाकरे यांनीच दिली. मात्र याठिकाणी मनसैनिकांचा हनुमान चालीसा पठणाचा लाऊडस्पीकर वाजलाच नसल्याने मनसेचा आवाज नेमका कशामुळे दबला, अशी चर्चा सुरू झाली आहे.
राज्यातील मशिदीवरील भोंगे उतरलेच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली होती. या मुद्द्यावर त्यांनी तीन जाहीर सभा घेतल्याने राज्यात काहीतरी गडबड होण्याची शक्यता अनेकांना वाटत होती. जिथे जिथे अजान, बांग देण्यात येईल, त्याठिकाणी दुप्पट आवाजात हनुमान चालीसाचे पठण करावे, असे आदेश राज यांनी दिले होते. मात्र राज यांच्या या घोषणेनंतर मुंबई पोलिसांनी आक्रमक पाऊले उचलण्यास सुरुवात केली. पोलिसांनी रात्रीच राज यांना १४९ अन्वये नोटीस बजाविली. त्यानंतर इतरही अनेक पदाधिकारी आणि नेतेमंडळींची धरपकड करण्यास पोलिसांनी रात्रीपासून सुरुवात केल्याने मनसे कार्यकर्त्यांना आंदोलन करता आले नाही. अर्थात अशा प्रकारच्या आंदोलनाबाबत पोलिस त्यांची कारवाई करणार, याची जाणीव मनसेच्या पदाधिकाऱ्यांनाही होती. तरीही कार्यकर्त्यांकडून नेहमीप्रमाणे गनिमी काव्याचे प्रकार का घडले नाहीत, याबाबत चर्चा होती.
मुंबईत अनेक मशिदींनी बुधवारी पहाटेची अजान न देण्याचा निर्णय घेतला. अनेक महत्त्वाच्या ठिकाणी मनसेतर्फे हे आंदोलन मोठ्या स्वरूपात करण्याची तयारी मंगळवारी रात्रीपासून सुरू केली होती. परंतु अनेक मशिदींवर बांग न वाजल्याने मनसेचा लाऊडस्पीकर वाजला नसल्याची माहिती मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी दिली. तर पोलिसांकडून अनेक कार्यकर्त्यांची सुरू केलेली धरपकड आणि नोटिसा दिल्याने बऱ्याच अंशी कार्यकर्त्यांनी एक पाऊल मागे टाकल्याची माहिती दबक्या आवाजात दिली. दरम्यान, जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे राज यांनी जाहीर केले असले तरी पहिल्याच दिवशी या आंदोलनाला मिळालेला अत्यल्प प्रतिसाद पाहाता या आंदोलनापुढे प्रश्नचिन्ह आहे.