मुंबई उच्च न्यायालयात सुट्टीकाळातही मॅरेथॉन कामकाज
![Heritage Walk! Now tourists can also visit the Mumbai High Court building](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/MUMBAI-HIGH-COURT.jpg)
मुंबई – कोरोना महामारीमुळे उच्च न्यायालयाच्या सुनावण्यांवरही निर्बंध आले आहेत. केवळ तातडीच्या आणि महत्त्वाच्या प्रकरणांवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी दिले आहेत. अशातच आता न्यायालयाच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु आहेत. सुट्टीच्या काळात तातडीच्या प्रकरणांवरील सुनावणीसाठी मुख्य न्यायमूर्तींनी ठराविक न्यायालये निश्चित केली आहेत. सध्या सुरू असलेल्या संपूर्ण आठवड्यासाठी न्यायमूर्ती काथावाला आणि न्यायमूर्ती तावडे यांच्या खंडपीठाचा समावेश आहे. त्यानुसार, या खंडपीठाने बुधवारच्या दिवसासाठी 80 प्रकरणे सुनावणीसाठी ठेवली होती.त्यामुळे बुधवारी न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठाने सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी सुरू केलेले ऑनलाईन कामकाज रात्री 11 वाजून 15 मिनिटांनी संपवले.
महत्त्वाचे म्हणजे कामाच्या ठरलेल्या तासांव्यतिरिक्त न्यायमूर्ती काथावाला यांनी पहिल्यांदाच काम केलेले नाही. यापूर्वीही जास्तीत जास्त वेळ न्यायालयीन सुनावणीचे काम केल्यामुळे न्यायमूर्ती काथावाला चर्चेत आले होते. मे 2018 मध्ये, सुट्टीच्या एक दिवस आधी, न्यायमूर्ती काथावाला यांनी एकमेव न्यायमूर्ती म्हणून कोणताही ब्रेक न घेता एकाच दिवशी तब्बल 120 प्रकरणांवर सुनावणी केली होती.
दरम्यान, न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठाने सुनावणी केलेल्या प्रकरणांमध्ये अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा समावेश होता. कोस्टल रोड प्रकल्पात अडथळा ठरणाऱ्या झाडांवरील तोडकामाची कारवाई, दहावीच्या परीक्षेचा प्रश्न, तर कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी स्टॅन स्वामी व हनी बाबू यांचे अंतरिम जामिनाचे अर्ज अशा अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणांचा समावेश होता. तसेच सर्वात शेवटी न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने केलेल्या एफआयआरमधील राज्य सरकारबाबत असलेल्या आक्षेपार्ह भागाविषयी राज्य सरकारने केलेल्या याचिकेवरील सुनावणी घेतली. मात्र ती अपूर्ण राहिली. अखेर रात्री 11 वाजून 15 मिनिटांनी ऑनलाईन कामकाज थांबले.