#Lockdown:मुंबईत केवळ पाच स्थानकांवर टॅक्सी सेवेला मंजुरी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/taxi-2.jpg)
मुंबई : मुंबईत टॅक्सी सेवा सुरु करण्यास अंशतः मंजुरी देण्यात आली आहे. केवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेंट्रल, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे टर्मिनस आणि दादर या स्थानकांवर टॅक्सी उपलब्ध असेल. प्रवाशांना रेल्वे स्टेशन आणि घर यादरम्यान प्रवासासाठीच टॅक्सी सेवा उपलब्ध राहील.
देशभरात आजपासून काही रेल्वे धावणार असल्यामुळे बाहेरगावाहून मुंबईत आलेल्या प्रवाशांना घरी जाण्यासाठी आणि ट्रेन पकडण्यासाठी स्टेशनवर जाणाऱ्या प्रवाशांसाठी टॅक्सी सेवा सुरु करण्याचा निर्णय परिवहन आयुक्तालयाने घेतला आहे. अत्यावश्यक कारणांसाठी राज्य सरकारने टॅक्सीला मान्यता दिली आहे.
टॅक्सीची शोधाशोध टाळण्यासाठी रेल्वे स्थानकावरच मुंबई टॅक्सीमेन्स संघटनेच्या प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या प्रवाशांना टॅक्सी आरक्षित करायची आहे, त्यांना फोन किंवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून नोंदणी करता येईल.