पुराच्या धोक्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक बंद
मुंबई – अतिवृष्टी आणि पुराचा धोका लक्षात घेता कोकण रेल्वेकडून रेल्वेगाड्या थांबविण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वेने गाड्या तात्पुरत्या थांबवण्याचा निर्णय घेतला असून चिपळूण ते कामाठे दरम्यान पुराचा धोका लक्षात घेऊन रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कोकणात सुद्धा मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोकणातून वाहणाऱ्या अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरे आणि गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या मार्गावरील वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आली असल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे. चिपळून आणि कामाठे रेल्वे स्थानकांदरम्यान वाहणाऱ्या वशिष्टी नदीच्या पुलाला पाणी लागले आहे. पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली.