कल्याण: सिंहगड एक्सप्रेसमध्ये चढण्यासाठी प्रवासी घालतायत जीव धोक्यात
![Kalyan: Passengers risk their lives to board the Sinhagad Express](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/9b5977ec-2542-417f-b698-cdb9d44fdc36-780x470.jpg)
दररोज सकाळी सहा वाजता कल्याण रेल्वे स्थानकात पुण्याहून येणाऱ्या सिंहगड एक्सप्रेसने मुंबईतील झटपट प्रवास करण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकातील बहुतांशी पासधारक प्रवासी रेल्वे मार्गात उतरुन उलट दिशेकडील दरवाजातून डब्यात शिरुन प्रवास करतात. सिंहगड एक्सप्रेस आली की फलाटावरील प्रवासी रेल्वे मार्गात उड्या मारुन या एक्सप्रेसने मुंबईत जाण्यासाठी धडपडत असतात. रेल्वे मार्गात एकाचवेळी मोठ्या संख्येने प्रवासी उतरत असताना रेल्वे सुरक्षा बळाचे जवान कोणतीही कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
प्रवासी रेल्वे मार्गात असताना अचानक लोकल किंवा एक्सप्रेस आली तर मोठा अपघात होण्याची भीती फलाटावरील प्रवाशांकडून व्यक्त केली जाते. दररोज सिंहगड एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्थानकातील सहा किंवा सात क्रमांकाच्या फलाटावर येते. या एक्सप्रेसने मुंबईत साडे सात ते आठ वाजेपर्यंत पोहचता येते. त्यामुळे सकाळीच कार्यालयीन वेळ असणारे मुंबईतील किंवा डहाणू, वसई, विरार भागात नोकरीला जाणारे बहुतांशी प्रवासी सिंहगड एक्सप्रेसने दादर पर्यंत जाऊन तेथून पश्चिम रेल्वेने इच्छित स्थळी जातात.
सिंहगड एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्थानकात आली की काही प्रवासी रेल्वे मार्गाच्या बाजुला किंवा फलाट क्रमांक पाचवर उभे राहून फलाट क्रमांक सहाला एक्सप्रेस उभी असली की उलट बाजूने डब्यात शिरकाव करतात. फलाटावर रेल्वे तिकीट तपासणीस असल्याने प्रवाशांची अडचण होते. त्यामुळे बहुतांशी प्रवासी रेल्वे मार्गात उतरुन एक्सप्रेस डब्याच्या उलट बाजुकडील दरवाजाने आत जातात. कल्याण रेल्वे स्थानक सोडल्यानंतर एक्सप्रेस मधील तिकीट तपासणीस आला तरी हे प्रवासी तिकीट तपासणीला विनंती करुन आपला पुढील प्रवास सुखरुप करुन घेतात, असे अनुभवी प्रवाशांनी सांगितले.
रेल्वे मार्गात उडी मारुन लोकल, एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर नियमित कारवाई केली जाते. सिंहगड एक्सप्रेसने मुंबईत जाणारे प्रवासी या दंडात्मक कारवाईत असतात. काही वेळा एक्सप्रेस आली की रेल्वे सुरक्षा बळाचे जवान अन्य फलाटावर तैनात असतात. त्याचा गैरफायदा प्रवासी घेतात, असे रेल्वे सुरक्षा बळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.