कल्याण-नाशिक ‘मेमू’ लोकल सुरू होणार! डिसेंबरपासून चाचणी
![Kalyan-Nashik 'Memu' local to start! Tested from December](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/Memu-train.jpg)
कल्याण – कल्याण आणि नाशिकला जोडणारी रेल्वेची मेमू लोकल सेवा लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी या महिन्यातच चाचण्या घेण्यात येणार आहेत. त्या यशस्वी झाल्यानंतर कल्याण-नाशिक दरम्यान ही लोकल सेवा सुरू होणार आहे. त्याचा फायदा शेतकरी, कामगार, विद्यार्थी, सामान्य नागरिक आणि व्यवसायिकांना होणार आहे. यामुळे अनेक वर्षांचे नाशिककरांचे लोकल प्रवासाचे स्वप्नही पूर्ण होणार आहे.
नाशिक-कल्याण मेमू लोकल सुरू करण्याची मागणी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी करून त्यासाठी रेल्वेकडे पाठपुरावा केला. परंतु मध्यंतरी लोकसभा निवडणुकीमुळे हा मुद्दा थोडा बाजूला पडला होता. या सेवेला रेल्वेनेही मान्यता दिली आहे. त्यासाठी चेन्नईच्या कारखान्यातून ३५ कोटींची मेमू लोकल खरेदी करण्यात आली आहे. सध्या ती कुर्ला करशेडमध्ये आहे. या लोकलच्या चाचणीसाठी ९ लाख मंजूर झाले आहेत. त्यामुळे डिसेंबरमध्ये तिची चाचणी होईल आणि २०२२ मध्ये नाशिक-कल्याण मेमू धावेल. त्यामुळे मुंबई आणि नाशिककरांना नवीन वर्षाची ही एक अनोखी भेट मिळणार आहे. यामुळे मुंबई आणि नाशिक जलद रेल्वे सेवेने जोडले जाणार असून त्याचा फायदा विद्यार्थी, शेतकरी, प्रवासी, सामान्य नागरिक आणि नोकरदारांना होणार आहे.