कल्याण-डोंबिवली महापालिका ‘कोविड इनोव्हेशन’ पुरस्कारात अव्वल
डोंबिवली | केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत घेण्यात आलेल्या ‘कोविड इनोव्हेशन’ पुरस्कारांमध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. करोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल कल्याण-डोंबिवली महापालिका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असणाऱ्या वाराणसीला संयुक्तपणे पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कामकाज खात्याचे राज्यमंत्री हरदीप पुरी यांच्या अध्यक्षतेखाली स्मार्ट सिटीच्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशभरातून १०० महानगरपालिकांनी या पुरस्कारासाठी कोविड काळात केलेल्या कामाचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवले होते. यामध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आयएमएच्या खासगी डॉक्टरांसह राबवलेल्या फॅमिली डॉक्टर-कोविड फायटरसह खासगी डॉक्टरांच्या ‘कोविड आर्मी’ उपक्रमाची विशेष दखल घेण्यात आली. पहिल्या फेरीत केडीएमसीने पहिल्या १० मध्ये मजल मारली होती. त्यानंतर घेण्यात आलेल्या अंतिम फेरीत वाराणसी आणि कल्याण डोंबिवली महापालिकेला संयुक्तपणे पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले. लवकरच नवी दिल्ली येथे एका सोहळयात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
हा पुरस्कार म्हणजे आयएमए डॉक्टर्स, खासगी डॉक्टर्स, महापालिका डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांचा, लोकप्रतिनिधी, सर्व नागरिकांचा हा सन्मान असल्याची प्रतिक्रिया माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
पुरस्कार जाहीर होताच अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, शहर अभियंता सपना कोळी – देवनपल्ली, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, डॉ. प्रतिभा पानपाटील यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने आनंदोत्सव साजरा केला.