breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

‘मी प्रामाणिकपणे BEST कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभा’; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बेस्ट कर्मचाऱ्यांना १५ लाखांत घरे देण्यात यावीत, आमदार प्रसाद लाड यांनी केली मागणी

मुंबई  : बेस्ट सेवा ही मुंबईकरांसाठी दुसरी लाईफलाईन आहे. परंतु मागील अनेक वर्षांपासून बेस्टच्या कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित होते. बेस्ट उपक्रमातील कामगार / अधिकाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांचीआता उकल झाली असून, या पार्श्वभूमीवर श्रमिक उत्कर्ष सभेचे अध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांच्या संकल्पनेतून “धन्यवाद देवेंद्रजी! कार्यपूर्ती सोहळा” या कार्यक्रमाचे आयोजन (२६ जुलै रोजी) यशवंतराव चव्हाण सेंटर येथे करण्यात आले आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बेस्ट कर्मचारी आणि श्रमिक उत्कर्ष सभेच्यावतीने विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. अतिशय भावनिक वातावरणात हा सोहळा संपन्न झाला, त्याचप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना देखील प्रातिनिधिक स्वरुपात पदोन्नती, सेवेत सामावून घेणे, ग्रॅज्युएटी देण्यात आली.

यावेळी ५९३ नैमित्तिक कामगारांना उपक्रमाच्या सेवेत सामावून घेण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी, ७८ कोटींचा कोविड भत्ता व सेवानिवृत्त कामगारांची अंतिम देयके देणे, पदोन्नती धारकांची नेमणूक पत्रे प्रदान करणे, जे. जे. उड्डाण पुलावर झालेल्या शाळा बसच्या अपघातातील जखमी विद्यार्थ्यांना वाचवणाऱ्या बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागातील कामगारांचा सत्कार यासह ग्रॅज्युएटीतील १२ वर्षापासून थकीत असलेल्या रकमेपैकी ३३२ कोटी रुपये वर्ग करण्याचा कार्यक्रम यावेळी संपन्न झाला. आपलं अंतिम ध्येय योग्य असत, तेव्हा मार्ग मिळतात. आजचा हा क्षण अतिशय भावनिक असून, श्रमिक उत्कर्ष सभेचे अध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी सातत्याने पाठपुरवा केला त्यामुळे बेस्टच्या कामगारांचे हे प्रश्न सुटू शकत आहेत. यापुढेही मी प्रामाणिकपणे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभा असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.

हेही वाचा –  भोसरीतील पूरपरिस्थितीनंतर तातडीने औषध व धुरफवारणी करा!

१६ वर्षांच्या संघर्षानंतर देखील बेस्ट कर्मचारी युनियन सेनेने कामगारांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले. त्यानंतर श्रमिक उत्कर्ष सभेशी संलग्न होऊन एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी, त्यांच्या ७ मागण्या पूर्ण करण्याचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापालिकेच्या सहकार्यामुळे तसेच बेस्टचे महाव्यवस्थापक श्री सिंघल, श्री अनिल डिग्गीकर यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे झाले. या कामांच्या पुर्ततेकडे आता आम्ही जात असल्याचे आमदार प्रसाद लाड यावेळी बोलताना म्हणाले. याकरिताच देवेंद्र फडणवीस यांचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो, त्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नव्हते, असेही पुढे बोलताना ते म्हणाले.

७०३ नैमित्तिक कामगारांना पूर्णवेळ सेवेत सामावून घेण्याचा निर्णय ऐतिहासिक असून, पहिल्या टप्प्यात १२३ जणांना सामावून घेण्यात आले. आता ८३ कामगारांना सामावून घेण्यात आले आहे. उर्वरित नैमित्तिक कामगारांना पूर्ण अधिकाराने अस्थायी करून घेणे बेस्टने मान्य केले आहे. त्याचप्रमाणे पुढे जशी पदे रिक्त होतील तसे त्यांना सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. मागील अनेक वर्षांपासून बेस्टची आर्थिक परिस्थिती पाहता ८०० कोटींच्या आसपास ग्रॅज्युएटीची थकबाकी प्रलंबित होती. महापालिकेशी चर्चा करून पाठपुरावा करून ३० टक्क्यांचा ३३२ कोटींचा ग्रॅज्युएटीचा पहिला टप्पा बेस्टला सुपूर्द करून, कामगारांना देण्यात येत आहे.

या कार्यक्रमास मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, विधान परिषदेतील भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर, श्रमिक उत्कर्ष सभेचे अध्यक्ष आमदार प्रसाद लाड, बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर, व्यवस्थापक पाटूस्कर, श्रमिक उत्कर्ष सभेचे सरचिटणीस भालचंद्र साळवी, बेस्ट कामगार युनियनचे सरचिटणीस संजय घाडीगावकर आणि रोहित केणी यांच्यासह मोठ्या संख्येने बेस्टचे कर्मचारी उपस्थित होते.

बेस्ट कर्मचारी बांधवांना सांगू इच्छितो, तुमच्या कामाची आणि मेहनतीची पै ना पै तुमच्या खात्यांवर पोहोचवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही! हे कार्य आम्ही अर्धवट सोडणार नाही. बेस्टचा एक मोठा इतिहास असून, आपलं अंतिम ध्येय योग्य असत, तेव्हा मार्ग मिळतात. मी प्रामाणिकपणे तुमच्या पाठीशी उभा आहे!

-देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

‘बेस्ट’ उपक्रमांतर्गत कामगारांना सेवेमधील विविध लाभ वाटपाचा कार्यक्रम आज संपन्न झाला. परंतु मुंबईतील २७ ठिकाणी असलेल्या बेस्टच्या वसाहतींच्या जागी पुनर्विकास करून म्हाडाच्या माध्यमातून किंवा अन्य पद्धतीने बेस्ट कर्मचाऱ्यांना १५ लाखांत घरे देण्यात यावीत, त्याचप्रमाणे बेस्ट डेपोच्या जागांचा पुनर्विकास करून त्याच्या वरील बाजूस व्यावसायिक भाडे पद्धतीने गाळे तयार केले तर त्यातून येणाऱ्या भाडे करारातून बेस्टला चांगल्या पद्धतीचा नफा होऊ शकतो. याबाबत सरकारने विचार करावा, अशी मागणी करतो.

-आमदार प्रसाद लाड,अध्यक्ष, श्रमिक उत्कर्ष सभा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button