ताज्या घडामोडीमुंबई

‘मी संपकऱ्यांकडून पैसे घेतल्याचं मान्य करतो’; कोर्टात सदावर्तेंची अखेर कबुली

मुंबई | एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं  नेतृत्व करणाऱ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या वकील गुणरत्न सदावर्ते यांना आज पुन्हा मुंबईत आणण्यात आले. सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी पुन्हा सदावर्ते यांचा ताबा घेतला. तसंच सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीच्या मागणीसाठी त्यांना आज गिरगाव येथील कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने सदावर्ते यांची रवानगी पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडीत केली आहे.

गुणरत्न सदावर्ते यांनी सुनावणीवेळी न्यायालयात स्वत:ची बाजू मांडली. युक्तीवाद करत असताना सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचं मान्य केलं आहे. दुसऱ्या एका गुन्ह्यात सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी मी अर्ज केला आहे म्हणून पोलीस माझी कोठडी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा त्यांनी यावेळी केला. तसंच मी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचं मान्य करतो, पण याबाबत कोणीही तक्रार केली नाही. आर्थिक व्यवहार तपासायचे असल्यास पोलीस कोठडीची काय गरज? पोलीस पहिल्या दिवशी माझ्या घरी आले तेव्हा त्यांनी सगळी तपासणी केली आहे. माझ्या घरी फक्त १३ वर्षांची मुलगी आहे आणि ती देखील पोलिसांना सहकार्य करत आहे, असंही यावेळी सदावर्ते म्हणाले.

 

‘सदावर्ते यांच्या घरातून संशयास्पद कागदपत्रे’

गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीची मागणी करताना सरकारी वकील प्रदीप घरत यांनी पुन्हा एकदा धक्कादायक दावा केला आहे. ‘मी एकाही कर्मचाऱ्याकडून पैसे घेतले नाहीत, एकही रुपया घेतला नाही, असं सदावर्ते याआधी वारंवार सांगायचे, मात्र आता त्यांनी पैसे घेतल्याचं मान्य केलं आहे. सदावर्ते यांच्या घरातून संशयास्पद कागदपत्रे आणि इतर गोष्टी सापडल्या आहेत. सदावर्ते यांनी परळ आणि भायखळ्याची मालमत्ता व एक गाडी खरेदी केली आहे. संपकाळात खरेदी करण्यात आलेल्या या मालमत्तेबाबत चौकशी करायची आहे,’ असा युक्तीवाद प्रदीप घरत यांनी कोर्टात केला आहे.

दरम्यान, दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर गिरगाव कोर्टाने अखेर गावदेवी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांची पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button