अनिल देशमुखांच्या याचिकेवर गुरूवारी उच्च न्यायालयाचा निर्णय
![Anil Deshmukh's application for bail will be heard in Sessions Court tomorrow](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/Anil-Deshmukh.jpg)
मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआयच्या एफआयआरविरोधात केलेल्या याचिकेचा मुंबई उच्च न्यायालय उद्या गुरुवारी निर्णय देणार आहे. या एफआयआरमध्ये सीबीआयने देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे. तर सीबीआय जाणीवपूर्वक, राजकीय हेतूने आरोप करत असून कायदेशीर तरतुदींचे पालन करत नसल्याचे या याचिकेतून देशमुखांनी स्पष्ट केले.
अनिल देशमुखांच्या याचिकेवरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सोमवारी पूर्ण झाली. या याचिकेत अनिल देशमुखांनी म्हटले आहे की, आपल्याविरोधात कोणतेही पुरावे तपास यंत्रणेकडे नाहीत. सीबीआयने केवळ राजकीय सूडापोटी आपल्याविरोधात एफआयआर घेतली आहे. या कथित आरोपांमागील मुख्य सूत्राधार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे एफआयआरमध्ये का घेतली नाहीत? त्यांचा सीबीआय काहीच तपास का करत नाही? असे सवाल या याचिकेतून उपस्थित केले आहेत. मात्र, देशमुखांचे हे सारे आरोप बिनबुडाचे असून तपास यंत्रणा याप्रकरणाची सखोल चौकशी करत आहे, सर्व बाजूंनी चौकशी करून तपास सुरू असल्याचा दावा सीबीआयच्यावतीने करण्यात आला. सोमवारी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने या याचिकेचा निर्णय गुरुवारी देण्यात येईल, असे सांगितले.