आरोग्य विभागाची परीक्षा होणारच, राजेश टोपे यांनी जाहीर केल्या संभाव्य तारखा
![Health department exams will be held, possible dates announced by Rajesh Tope](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/images_1585299288869_rajesh_tope.jpg)
मुंबई – आयत्या वेळेला रद्द केलेल्या आरोग्य विभागाची परीक्षा आता लवकरच होणार आहे. ही परीक्षा रद्द झाली नसून पुढे ढकलण्यात आली होती असं स्पष्टीकरण याधीच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. त्यानुसार त्यांनी आता तारीख जाहीर केली आहे. येत्या 15 -16 किंवा 22-23 ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्यानंतर सर्व स्तरातून टीका केली जात होती. भाजपनेदेखील याच मुद्द्याला घेऊन रान उठवलं होतं. परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की आल्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. आता हीच परीक्षा कधी होणार हे टोपे यांनी सांगितले आहे. 15-16 किंवा मग 22-23 ऑक्टोबरला आरोग्य परीक्षा होईल असं टोपे यांनी म्हटलंय. त्याचबरोबर येत्या दहा दिवसांत सर्व परीक्षार्थींना नव्याने प्रवेशपत्र दिले जातील, असेदेखील टोपे यांनी सांगितले आहे.