भिवंडीत कुंपण भिंत कोसळून पाच जण जखमी
![Five people injured after fence wall collapsed in Bhiwandi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/wall-collap-780x461.jpg)
भिवंडी | भिवंडी येथील चव्हाण कॉलनी भागातील महापालिकेच्या ख्वाजा गरिबुल नवाज हॉलची कुंपण भिंत कोसळून पाच जण जखमी झाले. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली.अलीशा (३), निजिया (१७), निजामुद्दीन अन्सारी (६०), फैजान (९) आणि जेनाब अझहर खान ( ४) अशी जखमींची नावे आहेत. भिवंडी येथील चव्हाण कॉलनी भागात महापालिकेचा ख्वाजा गरिबुल नवाज हॉल आहे. या हॉलची कुंपण भिंत मंगळवारी सायंकाळी कोसळली. त्यावेळी शेजारच्या रस्त्यावरून जात असताना हे पाचजण जखमी झाले.
या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्यासह आपत्कालीन विभाग प्रमुख, अग्निशमन दल, आपत्कालीन पथक यांनी घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणचा मलबा जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करण्यात आला आहे. जखमींना उपचारासाठी इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनतर नातेवाईकांनी त्यांना ख्वाजा गरीबुल नवाझ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या सर्वांची प्रकृती ठीक असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.