आमदार गीता जैन यांच्या नावे फेक व्हॉट्सऍप अकाऊंट; स्थानिकांकडे पैशांची मागणी
![Fake WhatsApp account in the name of MLA Geeta Jain; Demand for money from locals](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/Geeta-Jain.jpg)
भाईंदर – सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून फसवणूक करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मिरा भाईंदर शहराच्या स्थानिक आमदार गीता जैन यांच्या नावेही बनावट व्हॉट्सऍप अकाऊंट उघडल्याचा प्रकार समोर आला आहे. या फेक अकाऊंटवरून चक्क पैशांची मागणी केली जात असून या संदर्भात नवघर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या व्हॉट्सऍप नंबरवर आमदार गीता जैन यांच्या नावासह फोटो जोडण्यात आला आहे. फेसबुकचा आधार घेत शहरातील काही नागरिकांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सऍप करून पैशांची मागणी करण्यात येत आहे. मिरा भाईंदर शहराच्या आमदार थेट आपल्याकडे पैसे मागत असल्यामुळे काही नागरिकांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यामुळे काही जणांनी याची खात्री करण्यासाठी गीता जैन यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी हे बनावट खाते असल्याची बाब सर्वांच्या निदर्शनास आली. याबाबत पोलिसात तक्रार केल्यानंतर नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.