विधानसभा अध्यक्षपदाची निवड रखडली; मविआ सरकार-राज्यपाल संघर्ष पेटणार
![Election of Assembly Speaker stalled; Mavia government-governor conflict will ignite](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/bhagat-singh-koshyari.jpg)
मुंबई | विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीवरुन महाविकास आघाडी आणि राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीचा प्रश्न गेल्या बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे. अध्यक्षपदाची निवडणूक 9 मार्चला घ्यावी याबाबत राज्य सरकारने पत्र पाठवले होते. मात्र, त्यावर अद्याप राज्यपालांनी उत्तर दिलेले नाही. या प्रकरणाबाबत राज्यपालांना स्मरण पत्र देण्याबाबत मविआ सरकारमध्ये विचार सुरु आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मविआ सरकार-राज्यपाल संघर्ष पेटणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
महाविकास आघाडी सरकार आपला तिसरा अर्थसंकल्प यावेळी मांडणार आहे. कोरोनामुळे याआधीचे पावसाळी असो किंवा हिवाळी अधिवेशनाचे कामकाज कमी दिवस चालले होते. त्यामुळे लोकसभेचे कामकाज चालते त्यानुसार इथलंही कामकाज चालावे अशी भूमिका विरोधकांची आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव देखील कमी झाला आहे. त्यामुळं हे अधिवेशन पूर्ण वेळ चालेल अशी अपेक्षा आहे. अधिवेशनात अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांचा राजीनामा, 12 आमदारांची वापसी, भ्रष्टाचारावरुन आरोप-प्रत्यारोप यासह विविध मुद्द्यांवरुन रान पेटणार असल्याची शक्यता आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. विरोधकांनी कितीही गोंधळ घातला तरी मालिकांचा राजीनामा घेणार नाही, असा इशारा दिला आहे. नवाब मलिक यांच्यावर खोटे आरोप करत भाजप त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. खोटेनाटे आरोप करायचे, गोंधळ करायचा आणि विधानसभा अधिवेशनाच्या आधीच ते जाहीर करायचे, ही भाजपची कार्यपद्धती आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी यावेळी केली. त्यामुळे आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात मलिक यांच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चांगलीच ठणाठणी होण्याची चिन्हे दिसत आहेत