कोरोना काळात अध्यक्ष यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रोकड उलाढाली;
![During the Corona period, President Yashwant Jadhav made crores of cash;](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/yashwant-jadhav.png)
आयकर विभागाचा धक्कादायक अहवाल
मुंबई | एकीकडे २०२० आणि २०२१ मध्ये महाराष्ट्रातील जनता कोरोना महामारीत होरपळत असताना शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रोकड देऊन तब्बल ३६ इमारती खरेदीचा धडाका सुरू केला होता. जाधव यांनी याकाळात ३६ पगडीच्या इमारती रोख रक्कम देऊन विकत घेतल्या आहेत. त्यांनी माझगाव, भायखळा आणि बांद्रे भागातून २०२० मध्ये – ७ मालमत्ता तर २०२१ मध्ये २४ मालमत्ता येथून जाधव यांनी खरेदी केल्या आहेत. या जुन्या इमारती पगडी पद्धतीच्या आहेत. त्यातील एक हजाराहून अधिक घरे, दुकाने, गाळे जाधवांनी खरेदी केले आहेत. हा सुमारे एक हजार कोटीहून अधिक रुपयांचा हा घोटाळा असून आयकर विभागाच्या नुकत्याच पडलेल्या धाडीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. ईडी, आयकर विभागाने याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे.
कोरोनाच्या हाहाकाराने महाराष्ट्रात लॉकडाऊन आणि निर्बंध सुरु असताना मुंबई महापालिकेचे स्थाय़ी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मालमत्ता खरेदी जोरात सुरु अशी माहिती आयकर विभागाच्या तपासातून उघड झाली आहे. आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्या घरावर छापा काही दिवसांपूर्वी छापा मारला होता. या छाप्याच्या अहवालात शिवसेनेचे नेते आणि मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी २०२० आणि २०२१ या दोन वर्षाच्या कालावधीत कोट्यवधींची उलाढाल केली असल्याचे नमूद केले आहे.
या घोटाळ्याबाबत सूत्रांनी माहिती दिली की, आयकर विभागाच्या अहवालानुसार शेल कंपनींच्या माध्यमातून कोट्यावधींची उलाढाल करण्यात आली आहे. कॅश पैसा या शेल कंपनींना देण्यात आले आणि या कंपनीच्या माध्यमातून लिगल एन्ट्री स्वतःच्या आणि आपल्या निकटवर्तीयांच्या नावावर घेण्यात आल्या. लोनच्या स्वरुपात परिवारातील इतर सदस्यांना पैसे या शेल कंपनीकडून देण्यात आले. कोलकत्तात एन्ट्री ऑपरेटर असणारा उदय शंकर महावर हा काळा पैसा घेऊन पांढरा पैसा करतो. १५ कोटींची रोख रक्कम यशवंत जाधव यांनी उदय शंकर महावर यांना दिली आणि त्यानंतर उदय शंकर यांच्या कंपनीकडून आपल्या खात्यांमध्ये लीगल एंट्री करुन घेतली. यातील १५ कोटी पैकी १ कोटी यामिनी जाधव यांनी कर्ज घेतलं आणि ते निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलं. प्रधान डिलर्स या शेल कंपनीकडून यशवंत जाधव यांनी वेगवेगळ्या खात्यांमधून एकूण १५ कोटी रुपये कर्ज म्हणून घेतले. प्रधान डिलर्सच्या दोन कंपन्या स्कायलिंक कमर्शियल लिमिटेड आणि सुपरसॉफ्ट सप्लायर्स लिमिटेड यांच्या माध्यमातून पैसे ‘व्हाईट’ करण्यात आले असल्याचे आयकर विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या कंपन्यांचे कागदोपत्री संचालक चंद्रशेखर राणे, क्रिष्णा भनवारीलाल तोडी आणि धीरज चौधरी यांचा जबाब आयकर विभागाने नोंदवला आहे. या संचालकांनी माहिती दिली की दोन्ही कंपनी शेल कंपनी आहे. चंद्रशेखर राणे आणि प्रधान डिलर्स कंपनीतील माजी संचालक पियुष जैन यांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. या दोघांनीही डमी संचालक असल्याची कबुली दिली असून या शेल कंपनींचे नियंत्रण उदय शंकर महावरकडे असल्याचे सांगितले. उदय शंकर महावर यानं यशवंत जाधव यांच्या कुटुंबीयांसाठी अशा असंख्य एन्ट्रीज केल्याचा संशय आयकर विभागाला आहे. या सोबतच इतर शेल कंपनीकडून अशाच प्रकारे कोट्यवधींचा व्यवहार केला गेला आहे का, याचाही तपास आयकर विभाग करत आहे.
दरम्यान, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे की, यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांनी गेल्या दोन वर्षात ३६ इमारती खरेदी केली असून एक हजाराहून अधिक दुकाने, गाळे, घरे आहेत. याचा तपास ईडी, आयकर करत आहे. येत्या काही दिवसात मोठी करावी होईल, अशी मला खात्री आहे.जाधव यांची इतकी मालमता असेल तर त्यांच्या नेत्यांकडे किती मालमत्ता असेल असा सवाल सोमय्या यांनी केला आहे.
चौकट
२०२०-२०२१ मध्ये
३६ जुन्या इमारती खरेदी
मार्च २०२० मध्ये – १
डिसेंबर २०२० मध्ये २
जानेवारी २०२१मध्ये 3
फेब्रुवारी २०२१ मध्ये
2 मार्च २०२१मध्ये 5
मे२०२१ मध्ये १
जून २०२१ -मध्ये २
जुलै २०२१ मध्ये ६
ऑगस्ट २०२१ मध्ये २
आणि डिसेंबर २०२१ मध्ये ३
आदी मालमत्ता खरेदी केल्या आहेत.
खरेदी केलेल्या मालमत्ता
वांद्रे येथील वॉटर फिल्ड – ५ कोटी १० लाख रुपये,
माझगाव बिलखाडी चेंबर्स – 2 कोटी,
वाडी बंदर- माझगाव -१कोटी ६० लाख रुपये,
भायखळा येथील व्हिक्टोरीया गार्डन -२ कोटी २० लाख