ताज्या घडामोडीमुंबई

दादर चौपाटीवरील दर्शक गॅलरीचे लोकार्पण

मुंबई | पालिकेने दादर चौपाटीवर उभारलेल्या दर्शक गॅलरीचे बुधवारी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. पावसाचे पाणी वाहून समुद्रात नेणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्यांच्या पातमुखावर ही दर्शक गॅलरी उभारण्यात आली असून या गॅलरीला माता रमाबाई आंबेडकर यांचे नाव देण्याचे निर्देश या वेळी ठाकरे यांनी प्रशासनाला दिले. या गॅलरीमुळे मुंबईकरांना वरळी वांद्रे सेतूसह अथांग समुद्राचे सुंदर दृश्य न्याहाळता येणार आहे.

पालिकेच्या जी उत्तर विभागाने दादर चौपाटीलगत अभिनव व आकर्षक अशी दर्शक गॅलरी उभारली आहे. केवळ १० महिन्यांत उभारण्यात आलेल्या या आकर्षक, भव्य आणि विलोभनीय भव्य प्रेक्षक गॅलरीमुळे मुंबईकर आणि पर्यटकांना एक पर्यटनस्थळ उपलब्ध झाले आहे. चैत्यभूमीजवळ असणाऱ्या या पर्यटनस्थळाचे ‘माता रमाबाई आंबेडकर स्मृती व्ह्यूइंग डेक’ असे नामकरण करण्याचे निर्देश या गॅलरीच्या लोकार्पणाच्या वेळी आदित्य ठाकरे यांनी पालिका प्रशासनाला दिले. त्याचबरोबर यात धर्तीवर मुंबईतील इतर पातमुखांवर दर्शक गॅलरी उभारावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

विक्रमी कालावधीत काम पूर्ण ही गॅलरी समुद्रापासून सुमारे दहा फूट उंच आहे. २६ खांबांवर उभ्या असलेल्या गॅलरीचे क्षेत्रफळ १० हजार चौरस फूट इतके आहे. दर्शनी गॅलरीचे बांधकाम मार्च २०२१ मध्ये सुरू झाले आणि दहा महिन्यांच्या विक्रमी कालावधीत ते पूर्ण करण्यात आले. गॅलरीवर अत्याधुनिक एलईडी दिव्यांची आकर्षक प्रकाशयोजना करण्यात आली. येथे एका वेळी ३०० व्यक्ती उभ्या राहू शकतील. किमान १०० लोकांची बसण्याची व्यवस्था आहे. विविध प्रकारची १३० झाडे लावण्यात आली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button