नारायण राणेंच्या ‘अधिश’ बंगल्यात सीआरझेडचे उल्लंघन; पालिका अधिकारी उद्या करणार पाहणी
![CRZ violation in Narayan Rane's 'Adhish' bungalow; Municipal officials will inspect tomorrow](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/images-2022-02-19.jpeg)
मुंबई | प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील ‘अधिश’ बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाले असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी मुंबई मनपाला केली होती. त्यानंतर आता मुंबई मनपाने नारायण राणे यांच्या बंगल्याची तपासणी करण्यासाठी नोटीस बजावली आहे. त्यानुसार उद्या मुंबई महापालिकेचे अधिकारी नारायण राणेंच्या घराची तपासणी करणार आहेत.
मुंबई महापालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पाठविलेल्या नोटिशीत म्हटले आहे की, मुंबई महानगरपालिका कायदा 1888 अंतर्गत सेक्शन 488 नुसार प्रभाग अधिकाऱ्याला बांधकामाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणीबांधकामाची तपासणी करता येते. त्यानुसार महापालिकेचे अधिकारी नारायण राणेंच्या घराची तपासणी करणार आहेत. या तपासणीवेळी नारायण राणे यांनी बंगल्याचा प्रमाणित प्लॅन आणि इतर कागदपत्रांसमवेत स्वतः उपस्थित राहावे, असे या नोटिशीमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, कोस्टल रेग्युलेशन झोन (सीआरझेड) नियमांचे उल्लंघन करुन हा बंगला बांधण्यात आला असल्याची बाब संतोष दौंडकर यांनी महापालिकेला केलेल्या तक्रारीत नमूद केली. सीआरझेड नियमांचे उल्लंघन करत समुद्रापासून 50 मीटर परिसरात हा बंगला बांधण्यात आला असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.