#Covid-19: खाटांअभावी अत्यवस्थ करोना रुग्णांची तडफड
![# Covid-19: Emergency corona patients suffer due to lack of beds](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/bed-4.jpg)
- आरोग्य पथकाच्या इमारतीत ५० प्राणवायू खाटांची तयारी
पालघर |
पालघर जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात अत्यवस्थ करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जेमतेम १५० खाटांची सुविधा समर्पित करोना रुग्णालयात आहे. त्यात सक्रिय रुग्णांची संख्या आठवडाअखेरीस ४२९ने वाढली आहे. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना खाटा उपलब्ध होत नाहीत. बोईसर पूर्वेकडील एका रुग्णाला खाट उपलब्ध न झाल्याने त्याने रिक्षातही प्राण सोडला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खाटांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. पालघर येथे आरोग्य पथकाच्या आवारात नव्याने ५० प्राणवायू खाटांची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबरीने जिल्ह्य़ातील करोना काळजी केंद्रांची संख्यादेखील वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने प्रयत्न सुरू आहेत.
पालघर येथील ग्रामीण रुग्णालयातील २० खाटांची क्षमता दहाने प्रथम वाढवण्यात आली. नंतर शहरी भागात वाढलेल्या करोनाच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शासकीय आरोग्यसेवा कमी पडत असल्याने ग्रामीण रुग्णालयालगत असलेल्या वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत असलेली आरोग्य पथकाची जुनी इमारत जिल्हा प्रशासनाने २२ एप्रिल रोजी अधिग्रहित करण्याबाबतचे पत्र दिले आहे. या ठिकाणी पन्नास प्राणवायू खाटांची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने सामाजिक संस्थांची मदत घेण्यात आली असून ६० सिलेंडरच्या माध्यमातून हे करोना आरोग्य केंद्र येत्या दोन दिवसांत कार्यरत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या आरोग्य पथकाचा इमारतीमध्ये सुरू होणाऱ्या ५० खाटांच्या उपचार केंद्रात आरोग्य पथकाकडे असलेल्या २० परिचारिकांची सेवा अधिग्रहित करण्यात आली असून वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, कक्ष सेवक, आया तसेच ऑक्सिजन सिलेंडर, बाय पंप मशीन इत्यादी सुविधा नगर परिषद सहकार्य करणार आहे. यामुळे ८० गंभीर रुग्णांवर उपचाराची सुविधा होणार आहे.
- करोना काळजी केंद्रामध्ये वाढ
पालघर जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात १२ करोना काळजी केंद्र कार्यरत असून त्यामध्ये सौम्य लक्षणे असणाऱ्या १२०० हून अधिक करोना रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पालघर तालुक्यात आठवडाअखेरीस कांबळगाव व सफाळे येथे तसेच उधवा (तलासरी) येथे नवीन काळजी केंद्र सुरू करण्यात आले. आगामी काळात जव्हार, डहाणू व पालघर तालुक्यात नवीन केंद्र उभारण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.
वाचा- #Covid-19: करोना रुग्णांच्या अंत्यसंस्कारावरून नगरमध्ये वाद