#Coronolockdown:पोलीस व्हॅनमध्ये TikTok व्हिडीओ बनवला, कल्याणमध्ये दोघांवर कारवाई
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/tik-tok-video-4976.jpg)
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. लॉकडाऊनचं काटेकोरपणे पालन व्हावं म्हणून पोलीस या कठीण प्रसंगातही आपला जीव धोक्यात टाकून कर्तव्य बजावत आहेत. मात्र, काही जणांना लॉकडाऊनचं गांभीर्य अद्यापही कळलेलं नाही. कल्याणमध्ये एका तरुणाने लॉकडाऊनचं उल्लंघन करत चक्क पोलीस व्हॅनमध्ये TikTok व्हिडीओ बनवला. याप्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.
कल्याण-डोंबिवली कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. शहरात 28 ठिकाणं अशी आहेत, ज्या ठिकाणी नाकाबंदी केलेली आहे. येथे पोलीस रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. त्यांचं कर्तव्य बजावत आहेत. मात्र, येथील वालधूनी परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला. येथे पोलीस रस्त्यावर नाकाबंदीमध्ये व्यस्त असताना एका तरुणाने पोलीस व्हॅनमध्ये TikTok व्हिडीओ बनवला.
रोहित डांगे असं या तरुणाचं नाव आहे. पोलिसांचं लक्ष नसताना रोहित पोलीस व्हॅनमध्ये शिरला आणि खाली उतरला. त्याचा त्याने टिकटॉक व्हिडीओ तयार केला. हा व्हिडीओ तयार करण्यासाठी त्याला एका अल्पवयीन मुलीने त्याला साथ दिली. हा TikTok व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी दोघांविरोधात कारवाई केली आहे.