#Coronolockdownनवी मुंबईत अडकलेले 1200 कामगार विशेष रेल्वेने मध्य प्रदेशला रवाना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/Train-3.jpg)
नवी मुंबई : जगभरासह देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कारखाने, कंपन्या बंद पडल्या. त्यामुळे मोठ्या संख्येने मजूर रस्त्यावर आले. सार्वजनिक वाहतूकही बंद असल्यामुळे स्थलांतरित मजुरांना घरी जाणेही अशक्य होते. अखेर 42 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर नवी मुंबई येथून मध्य प्रेदशातील 1200 मजुरांना पहिल्या विशेष रेल्वेने भोपाळ येथे पाठवण्यात आले.
हे सर्व स्थलांतरित मजूर कामानिमित्त नवी मुंबईत आले होते. पण लॉकडाऊननंतर अनेकांना कंपनीतील मालकांनी काढून टाकले होते. त्यामुळे त्यांच्या जेवणाचे-राहण्याचे हाल होत होते. यावेळी सरकारकडून मजुरांना राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
मजुरांना तब्बल 42 दिवसांनी स्वत:च्या राज्यात, स्वत:च्या गावाकडे, स्वत:च्या घरी जायला मिळत असल्याने या सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान पहायला मिळत होते. या नागरिकांना जेवण, पाणी सॅनिटायझरसारख्या वस्तू प्रवासात बरोबर देण्यात आल्या होत्या. यात पुरुष, महिला आणि लहान मुलांचा समावेश होता. यावेळी कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस उपायुक्त अशोक दुधे, पंकज दहाणेही उपस्थित होते.
मजुरांनी रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन केले. तसेच अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या प्रवाशांना रेल्वेत बसवण्यात आले. त्यानंतर ही रेल्वे सोडण्यात आली.
नुकतेच चंद्रपुरातील हजारो मिरची तोडणी मजूर हे लॉकडाऊनमुळे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात अडकून राहिले होते. त्यांनाही विशेष ट्रेनने राज्यात आणले आहे. त्यानंतर या सर्व मजुरांची तपासणी करुन त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे देशभरात हजारो स्थालांतरित मजूर अडकून बसले होते. प्रत्येक राज्यातील मजूर आपल्या घरी जाण्यासाठी धडपडत होते. काहींनी तर हजारो किमी पायी जात आपले घर गाठले आहे. लॉकडाऊनचा फटका स्थलांतरित मजुरांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे.