#CoronaVirus: सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे लपवू नका, मोफत अँटिजेन टेस्ट करा, नवी मुंबई पालिका आयुक्तांचे आवाहन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/navi-mumbai-municipal-commissioner.jpg)
नवी मुंबई: आपल्या विभागात कोरोना बाधितांचे मृत्यू का होतात? याचा शोध वैद्यकीय अधिकारी यांनी घ्यायला हवा आहे. ज्येष्ठ नागरिक तसेच मधुमेह, ब्लडप्रेशर, हृदय विकार, किडनीचे आजार अशाप्रकारचे आजार असणाऱ्या व्यक्तींकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवे आहे. स्क्रिनिंग करताना ज्या ठिकाणी कोरोना बाधितांची संख्या जास्त आहे अशा भागावर विशेष लक्ष द्यावे, असे नवी मुंबईचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर म्हणालेले आहेत.
नागरी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील खाजगी व्यावसायिकांकडून तापाचे रुग्ण तसेच मधुमेह, ब्लडप्रेशर व इतर आजार असणा-या व्यक्तींची माहिती जमा करावी आणि त्यांची अँटीजेन टेस्ट करावी अशा सूचना दिल्या आहेत. सर्वसाधारणपणे नागरिकांमध्ये ताप, खोकला असला तरी लक्षणे लपवून ठेवण्याची प्रवृत्ती दिसून येते आहे. त्यामुळे लक्षणे असणाऱ्या नागरिकांनी मोफत उपलब्ध असलेली अँटिजेन टेस्ट करून घ्यावी. याविषयी अधिक जनजागृती करण्याबाबत आयुक्तांनी सूचना केल्या. तसेच याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते यांची मदत घेण्यास सांगितलेले आहे.