breaking-newsमुंबई

#CoronaVirus:कोरोनामुळे मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा वेग मंदावला

मुंबई : मुंबईत कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर दुसरीकडे पावसाळा जवळ आला आहे. कोरोनापाठोपाठ मुंबईच्या उंबरठ्यावर पावसाळ्यातील संकटही आहे. दरवर्षीप्रमाणेही यंदाच्या पावसाळ्यात मुंबई तुंबणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण मुंबई महापालिकेची सर्व यंत्रणा कोरोनाच्या संकटाशी झुंज देत आहे. त्यामुळे मुंबईतील अत्यावश्यक असणाऱ्या मान्सूनपूर्व कामांचा वेग अत्यंत मंदावला आहे.

मुंबईच्या नालेसफाईचं आणि मिठी नदीच्या स्वच्छतेचं लक्ष् अपूर्ण राहिले आहे. महापालिकेने आतापर्यंत जी मान्सूनपूर्व कामे सुरु केली आहे. त्यात प्रशासनाच्या म्हणण्यानुसार मिठी नदीतला केवळ 29 टक्के गाळ उपसण्यात आला आहे. दरम्यान पावसाळ्यापूर्वी 70 टक्के गाळ उपसण्याचं काम आवश्यक असते. तर उरलेले 30 टक्के काम हे पावसाळ्यात आणि त्यानंतर केले जाते.

पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. एवढ्या कालावधीत राहिलेल्या कामाचं लक्ष्य पूर्ण करणं अवघड आहे. तसंच, राहिलेली नालेसफाई वेगाने करायची म्हटली तरी मुंबईतून कामगारांनी गावाकडची वाट धरली आहे. त्यामुळे नालेसफाईला कामगार आणायचे कुठून हा देखील प्रश्न आहे. नालेसफाईची टेंडर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिली गेली आहेत. मात्र, कंत्राटदारांना कामगारच मिळत नसल्यानेही नालेसफाईची कामं रखडली आहेत.

मुंबई महापालिका क्षेत्रातील शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे अशा तिन्ही भागातून सुमारे 21.505 किलोमीटर लांबीचा मिठी नदीचा प्रवाह आहे. कंत्राट कालावधीदरम्यान मिठी नदीमधून सुमारे 1 लाख 38 हजार 830 मेट्रिक टन एवढा गाळ उपसण्याचे लक्ष्य असते.

यापैकी 70 टक्के म्हणजे 98 हजार 500 मेट्रिक टन गाळ हा पावसाळापूर्व साफसफाई म्हणून काढला जाणार आहे. या 98 हजार 500 मेट्रिक टनपैकी आतापर्यंत 26 हजार 118 मेट्रिक टन गाळ काढण्यात आला आहे. तसेच मुंबईत छोटे आणि मोठे नाले आहेत. ते सुद्धा 70 टक्के साफ झाले पाहिजेत.

मुंबईत नालेसफाई ही दोन टप्प्यात केली जाते. पण यंदा पहिल्या टप्प्यात नालेसफाई झालेली नाही. पालिका यंदा आतापर्यंत 60 टक्के नालेसफाई झाली असं सांगत आहे. पण प्रत्यक्षात ती झालेली दिसत नाही.

तर मुंबईत नालेसफाईच्या कामावर जरी कोरोनाचा परिणाम असला तरी योग्य पद्धतीने केली जात आहेत. तसेच पावसाळ्यात त्रास होणार नाही याची काळजी घेतली जात आहे, असं सत्ताधारी म्हणत आहेत.

कोरोनाचा परिणाम हा मुंबईतील इतर कामांवर सुद्धा पडला आहे. मुंबईत यंदा फल्डिंग स्पॉर्ट वाढले आहेत. मान्सून पूर्व काम अपुरी पडली आहेत. याठिकाणी पंप लावणे, तसेच या ठिकाणी पाणी साचू नये म्हणून उपाययोजना करणे ही काम केली जातात. मात्र यंदा हे सारं संथगतीने सुरु आहे.

तर दुसरीकडे मुंबईत पावसाळ्याआधी रस्त्याची कामे सुद्धा हाती घेतली जातात. पण यंदा कोरोना संकटामुळे काम करण्यासाठी ठेकेदाराना कामगार सुद्धा मिळालेली नाही. त्यामुळे मुंबईत अनेक भागात रस्त्याची कामे अपूर्ण राहिलेली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button