विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव चर्चेत
![Congress's Prithviraj Chavan's name is being discussed for the post of Assembly Speaker](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/prithviraj-chauhan.jpg)
मुंबई | प्रतिनिधी
आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक होत आहे. दुसरीकडे विधानसभेच्या अध्यक्षांची निवड २७ डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. दिल्लीत काँग्रेस नेत्यांच्या बैठकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली. भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर असले तरी विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव पुन्हा पुढे आले आहे.
याआधी विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसचे नेते होते. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षाची जागा रिक्त आहे. या हिवाळी अधिवेशनात अध्यक्षाची निवड होणार आहे. हे पद सोडल्यानंतर ते काय करणार हे सध्या तरी माहीत नाही. अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात येणार, यासाठी तर्कवितर्क लढवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस नेते नितीन राऊत, सुनील केदार हे दिल्लीत गेले होते.
या नेत्यांची काँग्रेस नेतृत्वासोबत बैठक झाली. या बैठकीत विधानसभा अध्यक्षाच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. नागपूर विधानसभा निवडणुकीत उमेदवारीवरून झालेल्या वादातून नाना पटोले, नितीन राऊत आणि सुनील केदार यांना बोलावण्यात आल्याची प्राथमिक चर्चा आहे.
मात्र, विधिमंडळाच्या अधिवेशनात अध्यक्षपदाची निवड होणार असल्याने यासंदर्भात पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाल्याचे सांगितले. मंत्रिमंडळातील एका ज्येष्ठ मंत्र्याची विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करणार आहे. त्यामुळे आता अध्यक्षपद कोणाला मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ही निवडणूक होण्याची शक्यता होती. मात्र, आता २७ तारखेला निवडणूक होणार असल्याचे नाना पटोले म्हणाले.