येत्या एक एप्रिलपासून सीएनजी स्वस्त
![CNG will be cheaper from April 1](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/CNG-will-be-cheaper-from-April-1.jpg)
मुंबई| प्रतिनिधी
राज्यात सीएनजी इंधनावर आकारण्यात येणाऱ्या मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करणारी अधिसूचना शुक्रवारी वित्त विभागाने जारी केली. त्यानुसार सीएनजीवर आता १३.५ ऐवजी तीन टक्के इतका कर आकारण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या एक एप्रिलपासून सीएनजी स्वस्त होणार असून, त्याचा लाभ सर्वसामान्यांना होणार आहे.
राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसांपूर्वीच पार पडलेल्या अधिवेशनात २०२२-२३ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी नैसर्गिक वायू, घरगुती पाइपगॅसच्या मूल्यवर्धित करात १०.५ टक्के कपात करण्याची घोषणा केली होती. या निर्णयाचा लाभ महिला, रिक्षा, टॅक्सीचालक, खासगी वाहनधारक यांना होणार असला, तरी राज्याच्या महसुलात अंदाजे ८०० कोटी रुपयांची घट अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर वित्त विभागाने शुक्रवारी सीएनजीवरील करकपातीची अधिसूचना अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जारी केली. प्रदूषण नियंत्रणासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचा राज्य सरकारचा दावा आहे.