“महाराष्ट्राला गरज असताना केंद्र सरकार पाकिस्तानला मोफत लस देतंय”
![Central government provides free vaccines to Pakistan when Maharashtra needs them](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/patole.jpg)
मुंबई |
“राज्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, शहरी भागासह ग्रामीण भागातही करोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. करोना रुग्णांमध्ये २० ते ४५ वर्षांतील तरुणांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आले आहे. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने हे तरुण बाहेर पडतात त्यामुळे करोनाची लागण तरुणांना जास्त होत आहे. हा धोका लक्षात घेऊन १८ वर्षांवरील सर्वांना सरसकट करोनाची लस द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. नाना पटोले यांनी महाराष्ट्राला लस पुरवठा करण्यावर केंद्र सरकारला खडेबोल सुनावले. “राज्यात करोनाचं संकट वाढत आहे. दुसरीकडे लसीकरणाची मोहिमही राबिवली जात आहे.
१ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील लोकांना लस देण्यास सुरुवात केली, ही चांगली बाब असली तरी सध्यस्थितीत तरुणांमध्ये करोनाची लागण झपाट्यानं होत असल्याचं समोर आल्यानं वयाची अट शिथिल करणे ही काळाची गरज आहे. यासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यासाठी परवानगी मिळवावी व राज्यभर मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घ्यावी. करोनाचा बदललेला विषाणू घातक असून, संक्रमणाचा वेगही अधिक आहे. फेब्रुवारीपासून करोनाबाधितांची संख्या वाढू लागली, तेव्हापासून २० ते ४५ वयोगटातील तरुणांना याचा संसर्ग झाल्याचं पाहायला मिळत आहे. नोकरी, कामानिमित्त घराबाहेर पडणारे हे तरुण घरी येऊन घरातील वयोवृद्ध, लहान मुलांमध्ये त्याचा संसर्ग होण्याची मोठी भीती आहे. त्यामुळे आता लसीकरणासाठी १८ वर्षांवरील तरुणांना लस देणं गरजेचं आहे. या वर्गातील सर्वांना लस दिली, तर करोना संक्रमणाची साखळी तोडणं सोपं होईल. देशात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध असतानाही केवळ वयाच्या अटीमुळे तरुणांना लस घेता येत नाही हे दुर्दैवी आहे. ज्या झपाट्यानं कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे, त्याच्यापेक्षा जास्त वेगानं लसीकरण केलं गेलं पाहिजे,” अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली आहे.
वाचा- महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन की कठोर निर्बंध?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित करणार