BMC कार्यक्षेत्रातील शाळा 31 डिसेंबर पर्यंत बंद- महापालिका आयुक्तांचे आदेश
![There is no space left for development in Mumbai](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/bmc-1.jpg)
मुंबई: मुंबई महापालिका शाळा आता थेट पुढच्या वर्षी म्हणजेच जानेवारी 2021 मध्ये सुरु होणार आहेत. महापालिका आयुक्त आय एस चहल यांनी आपल्या अधिकारांचा वापर करत मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व शाळा 31 डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याबाबतचे आदेश दिले आहेत. मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील शाळा या दिवाळीनंतर सुरु होतील, असा अंदाज वर्तवला जात होता. परंतू, आता थेट पुढच्याच वर्षी शाळा सुरु होणार असे स्पष्ट झालेले आहे. राज्यभरात अनलॉक करण्यात आल्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करण्यास सुरुवात केलेली आहे.
त्यामुळे दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जगभरातही कोरोनाची दुसरी लाट अनेक ठिकाणी आलेली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने सतर्कता बाळगत शाळांबाबत निर्णय घेतला जात आहे. दरम्यान, शाळा सुरु करण्याबाबत तयारी आणि तशा हालचाली सुरु करण्यात आलेल्या आहेत. त्या दृष्टीने शाळेतील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या कोविड चाचण्या घेतल्या जात आहेत. मुंबई शहरातील अनेक शाळा कोविड सेंटर्स म्हणून वापरण्यात आलेली होती. त्यामुळे या सर्व शाला सॅनिटाईज करण्यात येत आहेत.