महिलेसोबत अरेरावी केल्यानंतर झालेल्या वादावर भास्कर जाधवांची पहिली प्रतिक्रिया…
![Bhaskar Jadhav's first reaction to the argument after arguing with the woman](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/Bhaskar-Jadhav-4.jpg)
मुंबई |
चिपळूणमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत दौऱ्यात असणारे भास्कर जाधव यांच्यावर महिलेसोबत अरेरावी केल्याने सध्या टीका होत आहे. आपल्याला मदत करा, हवं तर आमदारांचा एक दोन महिन्याचा पगार देऊ नका अशी विनंती करणाऱ्या महिलेसोबत भास्कर जाधव यांनी अरेरावी केली. आमदारांचा सहा महिन्यांचा पगार दिला नाही तरी काही फरक पडत नाही सांगत महिलेच्या मुलाला आईला समजाव असं सांगतानाचा त्यांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान या वादावर भास्कर जाधव यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.“मला यावर काहीच बोलायचं नाही. लोकांना मदत करणं हाच माझा प्राथमिक हेतू आहे. कालही मला लोकांना मदत करायची होती. ती महिला माझ्या मुलीसारखी होती. तिच्यासोबत किंवा माझ्या नातू किंवा भाचासारख्या असणाऱ्या मुलासोबतही मी बोलायचं नाही आणि तेसुद्धा कोणत्यातरी चॅनेलच्या प्रतिनिधीला विचारुन बोलायचं असेल तर काम कऱणं कठीण आहे.
पण ज्यांनी मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरच सोशल मीडियावर लोक तुटून पडले आहेत,” असं भास्कर जाधव म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी आज आम्ही रस्ता साफ करत असून टीका करणारे कुठे आहेत अशी विचारणा केली. आपण त्यांना फार महत्व देत नाही असंही त्यांनी सांगितलं. जे कोणी हे घडवलं आहे त्याला योग्य वेळेला उत्तर देईन असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. “पाहणी करणं हा विषय संपला आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वत: चिखलात पायी फिरत पाहणी केली आहे. त्यांच्या आदेशानुसार तात्काळ साफसफाई करण्याची मोहीम आम्ही हाती घेतली आहे. त्यासाठी आपल्या मतदारसंघातून ४०० ते ५०० माणसं साहित्य घेऊन येथे पोहोचली आहे. तसंच नानासाहेब धर्माधिकारी यांच्या संस्थेकडून माणसं आली आहेत. याशिवाय डंपर वैगेरे मागवून शहर साफ कऱण्याचं काम सुरु आहे,” अशी माहिती भास्कर जाधव यांनी दिली.