TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

नाट्यगृहांमध्ये राजकीय कार्यक्रमांचा शिरकाव

मुंबई: मराठी नाटक हे प्रेक्षकांचे वेड आणि रंगकर्मींचा ध्यास. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत करोनामुळे ठप्प असलेल्या नाट्यव्यवसायाचा नवा अंक पुन्हा जोमाने सुरू होऊ पाहतो आहे. नव्या विषयांची आणि आशयांची नाटके प्रेक्षकांच्या भेटीला येऊ लागली आहेत. रंगकर्मींनी प्रेक्षकांना दर्जेदार नाटक देण्यासाठी कंबर कसली आहे, मात्र ज्या नाट्यगृहांच्या माध्यमातून नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची धडपड असते तिथे नाटकांऐवजी शासकीय वा राजकीय कार्यक्रमांना प्राधान्य मिळते आहे. अनेकदा नाटकांचे ठरलेले प्रयोग रद्द करून नाट्यगृहात हे कार्यक्रम पार पडतात, याबाबत रंगकर्मींनी संताप व्यक्त केला आहे.

करोना काळानंतर दर आठवड्याला शुक्रवार ते रविवार या सुट्टीच्या दिवसांमध्ये नाटकांच्या प्रयोगाला प्रेक्षकांची गर्दी होते, त्या तुलनेत इतर दिवसांमध्ये नाटक पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या कमी असते. त्यामुळे शुक्रवार ते रविवार या तीन दिवसांत होणाऱ्या प्रयोगांवर निर्मात्यांचा जोर असतो. महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये संपूर्ण आठवडाभर नाटकाचे प्रयोग लावले जातात. मात्र नाटकाच्या प्रयोगाच्या दिवशीच पालिकेचा अथवा राजकीय कार्यक्रम आयोजित केला गेला तर नाटकांच्या निर्मात्यांकडून थेट तारीख काढून घेतली जाते. निर्माते नेहमीच नाट्यगृहात जाऊन नाटकांच्या पुढील तीन महिन्यांच्या प्रयोगाच्या तारखा निश्चित करून घेतात. एकदा प्रयोगाची तारीख निश्चित झाली की तिकिट विक्री सुरू होते. त्यामुळे ठरललेल्या प्रयोगाच्या दिवशी राजकीय वा अन्य कार्यक्रमांसाठी नाट्यगृह दिले गेले तर नाट्य निर्मात्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. तिकीट विक्री झालेली असते आणि प्रयोग रद्द झाला म्हणून निर्मात्यांवर नाटकाचे पैसे प्रेक्षकांना परत करण्याची नामुष्की ओढवते. या सगळ्या प्रकारात नाट्यगृह व्यवस्थापनाकडून कोणतेही भाष्य केले जात नाही, असे रंगकर्मींचे म्हणणे आहे. ‘पालिकेचे अथवा राजकीय कोणतेही कार्यक्रम सहसा ऐनवेळी येत नाहीत. नाटकांच्या प्रयोगाच्या तारखा पाहूनच इतर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, क्वचित असा प्रसंग आलाच तर निर्मात्यांना पर्यायी तारीख दिली जाते’, अशी माहिती पालिकेच्या अखत्यारितील गडकरी रंगायतनचे व्यवस्थापक अजय क्षत्रिय यांनी दिली.

अशाप्रकारे नाटकाचे प्रयोग डावलून राजकीय वा शासकीय कार्यक्रमांना नाट्यगृह देण्याचे प्रकार खासगी नाट्यगृहात घडत नाहीत. ‘शिवाजी मंदिर हे नाटकाचे माहेर घर आहे. आम्ही कायम नाटकांनाच प्राधान्य देतो’, असे शिवाजी मंदरिचे व्यवस्थापक हरी पाटणकर यांनी सांगितले. एकीकडे पालिका वा शासनाच्या पाठबळामुळेच मनोरंजन व्यवसायाला उभारी मिळते. त्यामुळे किमान त्यांच्या अखत्यारित असलेल्या नाट्यगृहांमध्ये शासनाचे वा अन्य कार्यक्रम होऊ नयेत. त्यासाठी मैदाने वा अन्य राखीव जागा उपलब्ध आहेत, अशी अपेक्षा नाट्यनिर्मात्यांकडून व्यक्त केली जाते आहे.

महापालिकेच्या नाट्यगृह व्यवस्थापनाकडून असे प्रकार घडत नसल्याचा दावा करण्यात येत असला तरी वास्तव वेगळे आहे, असेही नाट्यनिर्मात्यांचे म्हणणे आहे. ‘मुंबईत आणि मुंबईच्या बाहेरील पालिकेच्या नाट्यगृहांमध्ये नाटकांच्या तारखा ऐनवेळेस राजकीय कार्यक्रमासाठी रद्द केल्या जातात, असे नाट्यधर्मी निर्माता संघचे सचिव आणि निर्माते दिलीप जाधव यांनी सांगितले. नाट्य व्यवस्थापक निर्मात्यांना तीन किंवा चार दिवस आधी पत्राद्वारे तुमच्या नाटकाचा प्रयोग रद्द केला जात आहे असे कळवण्यात येते’. अशापध्दतीने राजकीय कार्यक्रम ऐनवेळेस येतातच कसे?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राजकीय दबावाखाली येऊन आमचे प्रयोग परस्पर रद्द केले जातात हे अत्यंत खेदजनक असल्याचे सांगून राजकारण्यांनी त्यांचे कार्यक्रम मैदानात जाऊन करावेत, प्रेक्षकांच्या मनोरंजनाच्या जागेचा वापर करू नये, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

‘खासगी किंवा सरकारचे कार्यक्रम असल्यास नाटकाच्या प्रयोगांच्या तारखा रद्द केल्या जातात याहून दुर्दैव नाही. नाट्यगृह आणि सभागृह यातील साधा फरकही समजू नये’, अशी खंत निर्माते- अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केली. पालिकेच्या नाट्यगृहांमध्येच जर नाटकाच्या प्रयोगांना तारखा मिळत नसतील किंवा तारखा काढून घेतल्या जात असतील तर नाटकांसाठी हक्काचा मंच कसा मिळेल?, असा सवाल उपस्थित होतो आहे. प्रेक्षक आणि कलाकारांमधील दुवा न बनता अडचणी निर्माण करणाऱ्या सरकारी कार्यक्रमांना नाट्यगृहात बंदी केली पाहिजे, अशी मागणी सध्या नाट्यसृष्टीत जोर धरू लागली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button