सलून, ब्युटी पार्लरमध्ये एसी सुरू ठेवल्यास कारवाई होणार; महापौरांचा इशारा
![Announce the name of the minister in Karan Johar's party, otherwise apologize, Mayor challenges Ashish Shelar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/kishori-pedneekar.jpg)
मुंबई – तिसऱ्या स्तरात असलेल्या मुंबईत आजपासून ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये सलून, ब्युटी पार्लर आणि स्पा यांचाही समावेश आहे. मात्र त्यांना एसी सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे एसी सुरु ठेवल्यास कारवाईचा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
‘सलून, ब्युटी पार्लर आणि स्पा यांना परवानगी देण्यात आली असून ४ वाजेपर्यंत सुरु असतील. मात्र त्यांना एसी सुरु ठेवण्यास परवानगी नाही. जर एसी सुरु असला तर दंडही होऊ शकतो. एसीच्या माध्यमातून विषाणूंचा फैलाव होण्याची शक्यता असते’, असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे. तसेच मुंबईत रात्री ८ नंतर जमावबंदी आणि संचारबंदी एकत्रित सुरू राहील, असेही त्या म्हणाल्या.
त्याचबरोबर ‘कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी लोकल अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यासांठीच सुरू असून बसमध्येही फक्त बसून प्रवासाची परवानही आहे. उभं राहून प्रवास करण्या मनाई आहे. तसेच पाचव्या स्तरातून येणाऱ्या जिल्ह्यातील वाहनांना मुंबईत परवानगी नाही’, असेही त्यांनी यावेळी सांगितले.