संकेतस्थळाच्या आडून वेश्या व्यवसायात ढकलणारी टोळी जेरबंद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/fraud-online_2017071396.jpg)
विरार |
नोकरी संकेतस्थळावर आपले परिचय पत्र पाठवणाऱ्या युवतींचे परिचय पत्र चोरून त्यांना धमकावून वेश्या व्यवसायात लोटणारी टोळी मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक शाखेने जेरबंद केली आहे. यात पोलिसांनी २ जणांना अटक केले आहे. यातील एक आरोपी हा मेकॅनिकल अभियंता असून त्याने ‘किंडर अॅप’वर या महिलांचे बनावट खाते तयार करून हा व्यवसाय चालवला होता. यात त्याने अनेक उच्चशिक्षित मुलींना आपले सावज बनविले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी वसई येथील नवघर माणिकपूर एसटी बस डेपोजवळ एक महिला वेश्या व्यवसाय करण्यासाठी मुलींना घेऊन येणार असल्याची खबर अनैतिक मानवी वाहतूक शाखेला मिळाली होती. या नंतर पोलिसांनी सापळा रचून एका महिलेला अटक करून ४ पीडित मुलींची सुटका करून मुख्यआरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
दलाल जिया सावदेकर हिची मेकॅनिकल अभियंता संदीप पालशी ‘किंडर अॅप’वरून ओळख झाली दोघांची मैत्री झाली. आपण मेकॅनिकल अभियंता असून चांगल्या पगाराची नोकरी देतो सांगून तिच्या जोडीला काही फोटो काढले होते. काही दिवसांनी जियाला तुला भरपूर पैसा मिळेल असे सांगितल्यावर जियाने नकार दिला. त्यानंतर त्याने तिला धमकावत तिचे एडिट केलेले नग्न फोटो समाजमाध्यमावर टाकण्याची धमकी देऊन जियाला या व्यवसायात आणले. आणि नंतर तिच्यामार्फत तिच्या मैत्रिणींना आपले सावज बनवत राहिला. यासाठी त्याने ‘ओएलएक्स’ या नोकरी संकेतस्थळाचा वापर करत या संकेतस्थळावरील नोकरी शोधणाऱ्या उच्चशिक्षित मुलींना पर्सनल सेक्रेटरची नोकरी मिळेल असे सांगून त्यांच्याकडून त्यांचे फोटो मागवून घ्यायचा. महिन्याला ३० ते ५० हजार व इतर सुविधा मिळतील असे सांगत आपल्या जाळ्यात ओढायचा, आणि नंतर धमकावून या मुलीनां वेश्यागमनासाठी पाठवायचा. नाइलाजास्तव त्या मुली वेश्या व्यवसायात अडकत गेल्या. ‘किंडर अॅप’वरून ग्राहकांशी संपर्क करून तो त्या मुलींना ग्राहकांकडे पाठवायचा. पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या आधारे या टोळीचा छडा लावला. दरम्यान, नोकरीसाठी कोणत्याही समाजमाध्यमावर ,डेटिंग अॅपवर कोणत्याही मुलीनी आपली वैयक्तिक माहिती, फोटो अपलोड करू नका. समोरची व्यक्ती कोण आहे हे तपासून पाहावे. ओळखीशिवाय अनोळखी व्यक्तींना आपल्या पर्सनल डिटेल शेअर करू नये, बळी पडू नये असे आवाहन अतिरिक्त पोलीस आयुक्त एस. जयकुमार यांनी केले आहे.
वाचा- धक्कादायक! करोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबीजची लस, पुढे घडलं असं…