अरबी समुद्रात 40 मैलावर अडकलेल्या मच्छिमारांची अखेर सुटका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Untitled-8.png)
अरबी समुद्रात 40 मैलावर अडकलेल्या मच्छिमारांची अखेर तटरक्षक दलाने गुरूवारी सुटका केली. हे सर्व मच्छिमार दुपारी मुंबईच्या किनारपट्टीवर सुखरूप पोहोचले. परंतु त्यांना नौका खवळलेल्या समुद्रात तशीच सोडून यावं लागलंय.
भाईंदर येथील पाली भागातील १६ मच्छिमार ‘देव संदेश’ या नौकेने पश्चिमेकडे गेले होते. मंगळवारी इकडे मुंबईत धो-धो पाऊस सुरु झाला त्यावेळी समुद्राला उधाण आलं. यामुळे ही नौका खवळलेल्या समुद्रात अडकून पडली. तसा संदेश तटरक्षक दलाच्या वरळीतील समुद्री बचाव केंद्राला आला. या केंद्राने त्यावेळी जवळ असलेल्या तटरक्षक दलाच्या ‘ग्रेटशिप अस्मी’ या गस्ती नौकेला मदतीसाठी तिकडे पाठवले होते. परंतु मच्छिमार ही नौका सोडण्यास तयार नव्हते. बुधवारी सकाळी या नौकेत चहुबाजूने पाणी येत होते.
त्यामुळे मच्छिमारांनी नौका सोडावी, असे आवाहन दिवसभर तटरक्षक दलाकडून केले जात होते. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. अखेर तटरक्षक दलाने ‘कर्नल एसपी वाही’ ही आणखी एक नौका मदतीसाठी धाडली. या दोन्ही नौकांनी बुधवारी रात्रभर खवळलेल्या समुद्रात ‘देव संदेश’ नौकेवर करडी नजर ठेवली होती. अखेर गुरुवारी सकाळी मच्छिमारांनी नौका सोडली.
याबाबत तटरक्षक दलातील सूत्रांनी सांगितले की, ‘समुद्राची स्थिती सध्या खूप खराब झाली आहे. त्यातून ही नौका खूप खोल समुद्रात होती. त्यामुळेच नौका ओढत बाहेर आणणे शक्य नव्हते. परंतु अखेर गुरुवारी सकाळी या मच्छिमारांना नौका सोडावीच लागली.’
मच्छिमार नौका अत्यंत महागडी असते. त्यातून या नौकेत मच्छिमारीसाठीच्या जाळ्या होत्या. डिझेलसह अन्य बरीच सामग्री असते. झालेल्या नुकसानीची सरकारी भरपाई मिळण्यास खूप वेळ लागतो. यांत लाखो रुपयांचे नुकसान होते. म्हणूनच मच्छिमार नौका सोडण्यास तयार नसतात. परंतु समुद्राची स्थिती पाहता या मच्छिमारांना त्यांची नौका सोडून यावेच लागले.