मध्य रेल्वेवर ३६ तासांचा मेगाब्लॉक
![72-hour jumbo megablock on Central Railway from midnight today; Many express, local canceled](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/freepressjournal_import_2018_10_Mega-Block-thane.jpg)
मुंबई | प्रतिनिधी
ठाणे आणि दिवादरम्यान सुरू असलेल्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी मध्य रेल्वेकडून ३६ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी २ वाजता हा मेगाब्लॉक सुरू होणार असून सोमवारी पहाटे २ वाजेपर्यंत काम सुरू राहणार आहे. यादरम्यान ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरील स्थानकांवर गाड्या धावणार नाहीत. अप आणि डाऊन मार्गावरील सर्व लोकल गाड्या ठाणे ते कल्याणदरम्यान जलद मार्गावरून धावणार आहेत. यामुळे कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली या स्थानकांवरील उपनगरीय लोकल सेवा उपलब्ध राहणार नाही. मध्य रेल्वेकडून याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.
ठाणे ते दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी मध्य रेल्वेकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे. यासाठीच शनिवार, रविवार आणि सोमवार म्हणजेच ८, ९ आणि १० जानेवारी रोजी ३६ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकदरम्यान मुंबई ते कर्जत, कसारा, अंबरनाथ, बदलापूरच्या दिशेने धावणाऱ्या सर्व अप आणि डाऊन मार्गावरील लोकल गाड्या या ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरून न धावता जलद मार्गावर धावणार आहेत.
संपूर्ण ब्लॉकदरम्यान डोंबिवली स्थानकावरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल सेवा उपलब्ध नसतील. तसंच कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी ठाणे, दिवा, डोंबिवली आणि कल्याण इथून गाड्यांमध्ये चढण्याचं आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे काही मेल एक्स्प्रेस गाड्या आणि लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सोमवारी १० जानेवारी रोजी सकाळपासून अप आणि डाऊन मार्गावरील सर्व लोकल गाड्या या नेहमीच्या वेळापत्रकानुसार धावतील. रद्द झालेल्या गाड्यांची संपूर्ण माहिती https://cr.indianrailways.gov.in/ या अधिकृत रेल्वेच्या वेबसाइटवर उपलब्ध असेल.