हत्येनंतर इस्रायलला पळाला, २५ वर्षांनी मुंबईत परतल्यावर दुचाकीमुळे पोलिसांना सापडला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/man-arrested-1.jpg)
हत्येप्रकरणी जामीन मिळाल्यावर इस्रायलला पळून गेलेला आरोपी २५ वर्षांनी मुंबईत परतला. पोलिसांना याची माहिती समजली. मात्र, पोलिसांकडे फक्त त्याच्या दुचाकीचा क्रमांक होता. या आधारे पोलिसांनी आरोपीला शोधून काढले असून त्याची रवानगी तुरुंगात झाली आहे. ऑगस्टिन जोसेफ असे या आरोपीचे नाव आहे.
ऑगस्टिन जोसेफ (वय ५१) हा १९९२ मधील हत्या प्रकरणातील आरोपी आहे. जोसेफ आणि त्याच्या पाच मित्रांनी शिवडीमधील अंजूमन इस्लाम या तरुणाची हत्या केली होती. १९९२ मध्ये पैशांच्या वादातून ही हत्या झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली होती. १९९३ मध्ये जोसेफला या प्रकरणात जामीन मिळाला. १९९४ मध्ये जोसेफ इस्रायलला पळून गेला. जोसेफ आणि त्याची पत्नी इस्रायलला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तो अधूनमधून भारतात येत असल्याचेही पोलिसांना समजले होते. पण तो पोलिसांच्या जाळ्यात सापडत नव्हता.
सत्र न्यायालयानेही पोलिसांना जोसेफचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. क्राईम ब्रँचच्या युनिट क्रमांक ९ चे पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या पथकाला जोसेफ डिसेंबर २०१७ मध्येच भारतात परतल्याची माहिती मिळाली होती. तो मुंबईतील वांद्रे येथील नवीन घरात राहत असल्याचे पोलिसांना समजले होते. त्याच्याकडे दुचाकी असल्याचेही समोर आले होते. पोलिसांनी याच दुचाकीच्या आधारे आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली. पोलीस उपनिरीक्षक हरीश बनसोडे आणि पोलीस हवालदार प्रकाश वारंग यांना जोसेफची दुचाकी वांद्रे पश्चिमेत दिसल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांच्या पथकाने जोसेफला अटक केली. चौकशीदरम्यान जोसेफनेही गुन्ह्याची कबुली दिली, असे पोलिसांनी सांगितले.