समुद्रात सीमकार्ड फेकल्याने मोबाइलचोर जाळ्यात
मुंबई – पाच महागडय़ा मोबाइल फोनमधील सीमकार्ड काढून समुद्रात फेकणाऱ्यांकडे गस्तीवरील पोलिसांचे लक्ष गेल्याने मोबाइल चोरणाऱ्या टोळीचे पितळ उघडे पडले. मुंबई फिरण्याच्या निमित्ताने घरातून बाहेर पडलेल्या वर्धा येथील या तीन तरुणांना मरिन ड्राइव्ह पोलिसांनी अटक केली आहे. तिघांपैकी दोन तरुण अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी डोंगरी येथील बालसुधारगृहात करण्यात आली. तिसऱ्या साथीदाराचे नाव प्रतीक गौतम वावरी (१९) असे आहे. त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक दिगंबर फुके आणि पथक सोमवारी संध्याकाळी मरिन ड्राइव्हवर गस्त घालत होते. त्यावेळी कठडय़ावर बसलेले प्रतीक आणि त्याचे दोन मित्र एकामागोमाग मोबाइल उघडत होते. हे या पथकाला संशयास्पद वाटले. पथकाने तिघांना हटकले, चौकशी केली. समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने तिघांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
तिघांकडे एकूण सव्वा लाख रुपये किमतीचे पाच मोबाइल फोन सापडले. सध्या या मोबाइलच्या आयएमईआय क्रमांकाच्या आधारे पोलीस मालकांचा शोध घेत आहेत. हे मोबाइल मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी झालेले नाहीत. ते शहरात किंवा शहराबाहेर चोरी झाले असावेत. नागपूर ते मुंबई प्रवासादरम्यान लांबपल्ल्याच्या गाडीतही आरोपींनी मोबाइल चोरले असावेत, असा संशय पोलिसांना आहे. कोठडीत असलेल्या प्रतीकने मोबाइल कुठून चोरले याची माहिती बालसुधारगृहात असलेल्या अल्पवयीन साथीदारांना आहे, असे सांगून अंग झटकण्याचा प्रयत्न सुरू केल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली.