शाहीन बागच्या धर्तीवर मुंबईतही CAA, NRC विरोधात मुस्लिम महिलांचे ठिय्या आंदोलन
मुंबई |महाईन्यूज|
सुधारित नागरिकत्त्व कायद्या (सीएए) विरोधात मुंबईतील मुंबई सेंट्रल परिसरात २६ जानेवारीच्या रात्री उशीर मुस्लिम महिलांनी आंदोलनास सुरुवात केली. दिल्लीत शाहीन बागेत सीएएविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त कारवाई समितीद्वारे ‘मुंबई बाग’ असे नाव देऊन आंदोलनाला सुरुवात केली.
सीएएविरोधात फलक आणि नारेबाजी करत महिलांनी नागपाडाजवळील अरेबियन हॉटेलबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केलं. सुरुवातीला या आंदोलनात ७५ हून अधिक आंदोलनकर्ते सहभागी झाले होते, त्यानंतर आणखी आंदोलनकर्तेही यात सहभागी होतील अशीही माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. शाहीन बागमधील महिला आंदोलनकर्त्यांपासून प्रेरणा घेत आम्ही आंदोलनाला सुरुवात केली आहे. सुधारित नागरिकत्त्व कायदा हा आमच्यासाठी धोकादायक आहे, हा कायदा संविधानाच्या विरोधात आहे. सरकारला तो कायदा मागे घ्यायचा नाही म्हणूनच आम्ही ठिय्या आंदोलन करत आहोत, असं एक आंदोलनकर्ती महिला म्हणाली.