राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील अनेक नागरिकांचा मनसेत प्रवेश
![Environment Minister Aditya Thackeray to visit Kolhapur on Monday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/images_1582624904011_aaditya_thackeray.jpg)
मुंबई – राज्याचे पर्यटनमंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेतला आहे. वरळीतील हे कोणत्याही पक्षात नसलेले सर्वसामान्य नागरिक कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत. ‘सरकारकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र लॉकडाऊन काळात नागरिकांकडे दुर्लक्ष झालंय. आता राज ठाकरेंकडून अपेक्षा आहेत, त्यांचं नेतृत्त्व चांगलं आहे’, अशा भावना या नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. मनसेचे पदाधिकारी संतोष धुरी यांच्या नेतृत्त्वात अनेक जणांनी मनसेची वाट धरली आहे.
संतोष धुरी यांनी सांगितले, ‘वरळीतील एनजीओ, सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते आणि काही सामान्य नागरिकांनी मनसेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. वरळी मतदारसंघातील मतदारांनी शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत निवडून दिले होते. परिसराला युवा नेतृत्त्व मिळावे म्हणून आम्हीही याठिकाणी उमेदवार उभा केला नव्हता. मात्र काही महिन्यातच इथल्या मतदारांना त्यांच्या कामाची प्रचिती आली. सध्या कोणतीही निवडणूक नाही. परंतु राज ठाकरेंच्या नेतृत्त्वात काम करण्याची इच्छा या नागरिकांनी व्यक्त करत मनसेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.’