राज्यपाल, सीमाप्रश्नाबाबत ‘मविआ’ आक्रमक, १७ डिसेंबरला महामोर्चा
![Governor, 'Maviya' aggressive on border issue, grand march on 17th December](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/mavia-govenrment-against-eknath-shinde-devendra-fadanvis-780x470.jpg)
मुंबई । महाईन्यूज ।
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत वादग्रस्त विधाने करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सीमाप्रश्नी मवाळ धोरण स्वीकारल्याने राज्य सरकारविरोधात महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. या मुद्दयांवर १७ डिसेंबरला मुंबईत जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा विराट मोर्चा काढण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
विधिमंडळाचे आगामी अधिवेशन, राज्यपालांकडून सातत्याने केली जाणारी वादग्रस्त वक्तव्ये, महाराष्ट्रातून इतर राज्यांमध्ये होऊ लागलेले उद्योगांचे स्थलांतर, नव्याने तापू लागलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न इत्यादी विषयांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीला उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, भाई जगताप, खासदार संजय राऊत, विनायक राऊत, आदित्य ठाकरे आदी नेते उपस्थित होते. बैठकीनंतर घेण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकार आणि राज्यपालांना लक्ष्य केले. ‘‘राज्यपाल हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा सातत्याने अवमान करीत आहेत.