येत्या 1 ऑक्टोबर पासून मुंबई-गोवा क्रुझ सेवा
मुंबई – मुंबईहून गोव्याला क्रुझ सेवेने जाता यावे यासाठीच्या घोषणा बऱ्याच दिवसांपुर्वी करण्यात आल्या आहेत. पण प्रचंड विलंबानंतर ही सेवा आता येत्या 1 ऑक्टोबर पासून सुरू केली जाणार आहे. जहाज वाहतुक खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनीच येथे ही माहिती दिली. ते म्हणाले की मुंबईच्या सागरी किनाऱ्यावर क्रुझ टर्मिनल उभारण्यासाठी आमच्या मंत्रालयाने एक हजार कोटी रूपये खर्च केले आहेत.
हे टर्मिनल अंतिम टप्प्यात आले असून या टर्मिनल पासून येत्या 1 ऑक्टोबर रोजी गोव्याला पहिली क्रुझ रवाना होईल. क्रुझ म्हणजे अलिशान आणि आरामदायी जहाज सेवा आहे. त्याचा पर्यटनाच्या विकासाला मोठा उपयोग होऊ शकणार आहे. या सेवेच्या प्रारंभासाठी या आधी ऑगस्ट आणि डिसेंबर असा वायदा झाला होता. पण त्या अवधीत ही सेवा सुरू होऊ शकली नव्हती. पण आता मात्र गडकरींनी ऑक्टोबरचा वायदा केला आहे. मुंबईच्या दोन समुद्रात दोन तरंगती हॉटेल्सही उभी केली जाणार असल्याची घोषणा गडकरींनी केली होती.