…म्हणून ‘ती’ लोकल बेलापूरएेवजी वांद्र्याला गेली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/train-local-1-.jpg)
मुंबई : हार्बर मार्गावर सोमवारी रात्री बेलापूर लोकल वडाळ्याहून चुकून वांद्रेच्या दिशेने गेल्याने झालेल्या गोंधळाची मध्य रेल्वेतर्फे चौकशी केली जाणार आहे. या प्रकाराने प्लॅटफॉर्मवरून दोन विभिन्न दिशांना जाणाऱ्या मार्गिकेची दिशा ठरवण्यात गफलत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
हार्बर मार्गावर सोमवारी रात्री ९.४० वाजता सीएसएमटीहून सुटलेली लोकल बेलापूरला जाणे अपेक्षित होते. पण वडाळा येथे आल्यानंतर या लोकलला वांद्रेच्या दिशेने जाण्याची सूचना देणारी पिवळी पट्टी दर्शवण्यात आली. एकाच ठिकाणाहून जाणाऱ्या दोन मार्गिकांवरील सिग्नलवर अशा प्रकारची पट्टी असते. या पट्टीने वांद्र्याकडे जाण्याची सूचना दिली असली तरीही मोटरमनला पुढचा मार्ग ठाऊक असल्याने त्याने लागलीच सावधगिरी बाळगली. हा सिग्नल चुकीचा असल्याचे लक्षात आल्याने त्याने नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला.
मात्र, तोपर्यंत लोकलने बरेच अंतर कापले होते. त्यामुळे गाडी किंग्ज सर्कल स्थानकापर्यंत नेण्यात आली. तिथे पोहोचल्यावर प्रवाशांना सूचना देऊन लोकल तिथेच रिकामी करण्यात आली. त्यानंतर ही लोकल बेलापूरसाठी रवाना करण्यात आली. या गोंधळात सुमारे अर्धा तास गेला. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.