मेट्रो प्रवाशांसाठी विमा योजना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/delhi-metro.jpg)
- १०० किमी प्रवास केलेल्या पास, स्मार्ट कार्ड धारकांपुरती मर्यादित
मुंबई – घाटकोपर-वर्सोवा मेट्रो मार्गावर प्रवाशांची संख्या वाढावी यासाठी निरनिराळ्या सुविधांच्या पायघडय़ा घालणाऱ्या ‘मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड’चे (मेट्रो-१) प्रशासन आता प्रवाशांचा विमा उतरविणार आहे. नव्याने राबविलेल्या ‘रॉयल्टी प्रोग्राम’अंतर्गत २६ जानेवारीपर्यंत जो प्रवासी या मार्गावर १०० किमीचा प्रवास पूर्ण करेल त्याचा ४.५ लाख रुपयांचा विमा उतरविण्यात येणार आहे. केवळ मासिक पास आणि मेट्रो स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
मेट्रो-१ मार्गाला सुरुवातीपासूनच प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. २०१७-१८ या कालावधीत या मार्गिकेवरील प्रवाशांत १३ टक्क्यांनी वाढ झाली असून सध्या या मार्गावर रोज सुमारे साडेतीन लाख प्रवासी ये-जा करतात. रोजच्या ३७८ फेऱ्यांमध्ये वाढ करून ३८६ करण्यात आल्या आहेत. प्रवाशांची संख्या आणखी वाढावी यासाठी मेट्रो प्रशासन सध्या वेगवेगळ्या योजना राबवीत आहे.