मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात महापालिकेकडून प्लाझ्मा केंद्र सुरू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/plasma-therapy.jpg)
महापालिकेने मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात प्लाझ्मा केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात प्लाझ्मा डोनरकडून मिळालेल्या अँटीबॉडीजमुळे 11 रुग्ण बरे झाले आहेत. या आगोदर 4 रुग्ण बरे झाले होते. प्लाझ्मा थेरपीमुळे नायर रुग्णालयात आतापर्यंत १५ रुग्ण बरे झाले आहेत. याशिवाय पालिकेच्या सायन, केईएम, कस्तुरबा रुग्णालयासह राज्य सरकारच्या अखत्यारीतील जे.जे. रुग्णालयातही प्लाझा थेरपीची कार्यवाही सुरू असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.
मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर एकीकडे बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत प्लाझ्मा थेरपीमुळे मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातून 15 जणांनी कोरोनावर मात केल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली. तसेच प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाल्यामुळे केईएम, सायन, जेजे रुग्णालयातही प्लाझ्मा थेरपी करण्यासाठी दात्यांकडून अँटीबॉडीज मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मुंबईत वाढत आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/images_1562649119700_nair_hospital-1024x575.jpg)
मुंबईत शुक्रवारी नवीन 1 हजार 297 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 117 जणांचा मृत्यू झाला. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 72 हजार 287 वर पोहचला आहे, तर मृतांची संख्या 4 हजार 177 झाली आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी पालिकेकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ५५ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईमधील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४१ दिवसांवर पोहचला आहे. तर आठवड्याचा कोरोना वाढीचा दर १.७२ टक्क्यांपर्यंत खाली आहे.