मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने एमएमआरडीए मेट्रो 2 बी प्रकल्पासंबंधित 3 निविदा रद्द
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/const-site-road_f.jpg)
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने एमएमआरडीए मेट्रो 2 बी प्रकल्पासंबंधित तीन निविदा रद्द केल्या आहेत. या निर्णयामागचे ठोस कारण अद्याप कळू शकलेले नाही. सिव्हिल वर्कसंदर्भात निविदा रद्द करण्यात आल्याने या प्रकल्पपूर्तीला आणखीन उशीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकल्पासाठी डिसेंबर २०२२पर्यंत डेडलाइन निश्चित करण्यात आली आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पाचे मंडाळे डेपो ६.९ टक्के, मेट्रो स्थानके १.९ टक्के, मेट्रो पूल ८.९ टक्के असे एकूण ७ टक्के काम पूर्ण झाले आहे. निविदा रद्द झाल्यामुळे या मार्गावर बांधण्यात येणाऱ्या तीन आयकॉनिक पुलांचे कामही रखडण्याची शक्यता आहे.
सध्या मेट्रो 2-बी डीएन नगर ते मंडाळे या प्रकल्पाचे काम १८० श्रमिकांसह प्रगतिपथावर असून, ५ स्थानकांचे फाउंडेशन आणि पायलिंगचे १५ टक्के काम पूर्ण झाल्याचे कळते आहे. अशावेळी या मार्गावरील निविदा रद्द करण्यामागे, प्रकल्पांची किंमत कमी करणे आणि हा प्रकल्प मोठ्या पॅकेजमध्ये समाविष्ट करणे अशी महत्त्वाची दोन करणे असल्याचे बोलले जात आहे. तसेच याच मार्गावर बीकेसी एंट्री पॉइंट, वाकोला नाला क्रॉसिंग आणि मिठी नदीवर बनवण्यात येणाऱ्या पुलांचे रद्द करण्यात आलेल्या निविदा जूनमध्ये काढण्यात येणार होते. मात्र, याची तांत्रिक बोली १४ ऑगस्ट रोजी खुली करण्यात येणार असल्याचे कळते आहे.
एमएमआरडीएने काही महिन्यांपूर्वी याच मार्गावर काम करणाऱ्या सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि आरसीसी-एमबीझेड जेव्हीचे या दोन कंत्राटदाराची निविदा रद्द केली होती. कामात हलगर्जी दाखवल्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. यानंतर फेब्रुवारी महिन्यात उर्वरित दोन पॅकेजेसच्या उर्वरित डीएन नगर-बीकेसी-चेंबूरच्या बांधकाम कामासाठी निविदा मागविण्यात आल्या. साधारण जुलै महिन्यात तांत्रिक निविदा खुली करण्यात आली. यावेळी ५ उमेदवारांकडून ८ बोली लावण्यात आल्या.
या निविदांनुसार पॅकेज १ मध्ये डीएननगर ते एमटीएनएल वांद्रे दरम्यान बांधकाम सुरू असून, याअंतर्गत इएसआयसीनगर, प्रेमनगर, इंद्रनगर, नानावटी हॉस्पिटल, खीरानगर, सारस्वतनगर, नॅशनल कॉलेज, वांद्रे, इन्कम टॅक्सी ऑफिस आणि आयएलएफएस अशा १० एलिव्हेटेड डेक आणि १० एलिव्हेटेड स्टेशनची निर्मिती होणार आहे. तर, एमटीएनएल बीकेसी ते चेंबूर दरम्यान तयार होणाऱ्या पॅकेज दोनमध्ये आरेखन आणि एलिव्हेटेड स्थानकांचे उर्वरित बांधकाम बाकी आहे. यामध्ये बर्वे मार्ग, कुर्ला पूर्व, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि चेंबूर स्थानक अशा स्थानकांचा समावेश आहे.