मुंबईत 2100 मंडळांना गणेशोत्सवाची परवानगी; 256 अर्ज नाकारले
![On the occasion of Ganesh Jayanti, find out the date, time of the moment, Pooja](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/festivals-holidays-ganesh-chaturthi-wallpaper-preview.jpg)
मुंबई – मुंबईत मोकळ्या जागेत, रस्त्याच्या कडेला गणेशोत्सव साजरा करणाऱ्या 2 हजार 700 पैकी 1820 मंडळांना महापालिकेने आतापर्यंत परवानगी दिली असून 274 मंडळांना परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर अटी-शर्तींची पूर्तता केली नसल्यामुळे 256 मंडळांना परवानगी नाकारण्यात आली आहे. मुंबईत यावर्षी तब्बल 350 मंडळांनी परवानगीसाठी पालिकेकडे अर्जच केला नसल्याचे उघड झाले आहे.
मुंबईत सुमारे 12 हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून यातील 2 हजार 700 मंडळे मोकळ्या जागेत, रस्त्याच्या बाजूला मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करतात. तर दोन लाखांवर घरांतही गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र, यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने अनेक मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अनेक बड्या मंडळांनाचाही समावेश आहे. त्यामुळेच यावर्षी अर्ज करण्याचे प्रमाण कमी असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. शिवाय मंडळे आणि घरगुती उत्सवही यावर्षी 11 दिवस न करता कमी दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे मिरवणूक तसेच विसर्जनस्थळी आरती करण्यास बंदी असल्याचे पालिकेने याआधीच स्पष्ट केले आहे. मंडळे आणि घरगुती गणेशोत्सवातील मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावांची संख्या यावर्षी पाच पटींनी वाढवून तब्बल 167 करण्यात आली आहे. शिवाय मूर्ती विसर्जनाला नेण्यासाठी पालिकेची वाहने सोसायटीच्या गेटजवळही गणेशमूर्ती स्वीकारणार आहेत. तसेच फिरत्या कृत्रिम विसर्जन तलावाच्या माध्यमातून सोसायटीजवळ विसर्जनासाठी मूर्ती स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे.