मालाड येथे रस्त्याच्याकडेला शेकडो मेलेल्या कोंबड्या आढळून आल्यानं एकचं खळबळ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/310924007_1-2-scaled.jpg)
मालाड येथे रस्त्याच्याकडेला शेकडो मेलेल्या कोंबड्या आढळून आल्यानं येथील रहिवाश्यांमध्ये एकच खळबळ उडाली. कोरोना व्हायरसमुळेच या कोंबड्या मेल्या असून परिसरात करोनाचा फैलाव वाढणार असल्याच्या अफवा पसरल्याने येथील नागरिक भयभीत झाले होते.
काही कारणामुळे या कोंबड्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या कोंबड्या थेट पोल्ट्री फार्ममधून आणून मालाडच्या ऑर्लम चर्चजवळ असलेल्या शिवसेना शाखेलगतच्या कचराकुंडीत टाकण्यात आल्या. येथून जाणाऱ्या एका पत्रकाराच्या हा प्रकार लक्षात आला. त्याने याबाबत कोंबड्या आणून टाकणाऱ्या मजुरांकडे कोंबड्यांच्या मृत्यूबाबत चौकशी केली असता या कोंबड्यांना दानापानी न मिळाल्याने वाहनातच या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे या कोंबड्या कचराकुंडीत फेकण्यासाठी घेऊन आल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र, कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावला असल्याने स्थानिकांनी या कोंबड्या कचराकुंडीत टाकण्यास विरोध केला. कोंबड्या मेल्यामुळे परिसरात करोनाचा संसर्ग वाढण्याची भीती स्थानिक व्यक्त करत होते. तसेच कोंबड्या फेकून पोल्ट्रीवाले पसार झाल्याने स्थानिकांचा संशय अधिक बळावला आणि करोना संसर्गामुळेच या कोंबड्या मेल्याची अफवा संपूर्ण परिसरात पसरली.
स्थानिकांनी याबाबत पोलिसांकडेही तक्रार केली. त्यामुळे पोलीस आणि पालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनीच या मेलेल्या शेकडो कोंबड्या कुंडीतून काढण्यास सुरुवात केली. या कोंबड्या कोरोना काळात मेल्या आहेत. या कोंबड्यांना कोरोनाची लागण झाल्यानेच त्यांचा मृत्यू झाला असावा असा आमचा अंदाज आहे. नाही तर केवळ दानापानी मिळाला नाही म्हणून एकाच वेळी एवढ्या कोंबड्या कशा दगावतील? असा सवाल स्थानिक रहिवाशी स्टिफन डिसूजा यांनी केला. या घटनेची चौकशी झाली पाहिजे. तसेच दोषींवर प्रशासनाने कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.