‘मानव-बिबटा संघर्ष’ अभ्यास करण्यासाठी अकरा सदस्यीय समितीची स्थापना
![Establishment of an eleven-member committee to study the ‘human-bibata conflict’](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/Bibta.jpg)
मुंबई – मागील काही वर्षात राज्यात मानव व बिबटा यांच्या संघर्षात मोठी वाढ झाल्याने तसेच बिबट्यांची मृत्यू संख्यासुद्धा वाढत असल्याने याच्या कारणांचा अभ्यास करण्यासाठी एक तांत्रिक अभ्यास समिती नेमावी, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत केली होती. त्या अनुषंगाने ११ सदस्यीय तांत्रिक अभ्यास समिती नेमण्यात आली असून ही अभ्यास समिती पुढील तीन महिन्यात आपला अहवाल सादर करेल, अशी माहिती वन मंत्री संजय राठोड यांनी दिली.
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव (पश्चिम) मुंबई सुनील लिमये यांचे अध्यक्षतेखाली ही ११ सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती बिबट्यांच्या मृत्यूच्या कारणांचा अभ्यास करणे, त्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना सुचविणे, बिबट्यांमुळे मनुष्य हानीच्या घटनांमध्ये झालेल्या वाढीचा अभ्यास करणे व मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना सुचविणे या बाबत तांत्रिक अभ्यास करून आपला अहवाल शासनास सादर करणार आहे.