माजी आमदार रमेश कदमांची राष्ट्रवादीत घरवापसी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/NCP-Ramesh-Kadam.jpg)
मुंबई | रत्नागिरीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांची पक्षात घरवापसी झाली. राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर शेकाप-भाजप-काँग्रेस असा झालेला त्यांचा राजकीय प्रवास अखेर वर्तुळाकृती होऊन राष्ट्रवादीतच पूर्ण झाला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत रमेश कदम यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला.
“राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून रमेश कदम यांचे पक्षाला पाठबळ लाभले. काही कारणांमुळे मधल्या काळात ते वेगळे झाले. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक निवडणुकांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. कोकणात आता पक्ष मजबुतीसाठी त्यांच्यासह पुन्हा जोमाने कामास सुरुवात करु” अशा भावना सुनील तटकरे यांनी व्यक्त केल्या.
“अनेक मान्यवरांनी पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण राजकारण हे बेरजेचे करायचे वजाबाकी, भागाकाराचे नाही. पक्ष बळकट करण्यासाठी आपले चौफेर प्रयत्न सुरु आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची अनेकांची इच्छा आहे. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांनीही घरवापसीची इच्छा प्रकट केली आहे. त्यामुळे सर्व चांगल्या प्रवृत्तीचे लोक पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत” असे संकेत यावेळी जयंत पाटील यांनी दिले.