‘मराठी वरून राजकारण करणाऱ्या ठाकरे सरकारला आता मराठी महिन्यांचा सुद्धा तिरस्कार; आमदार अतुल भातखळकरांचा घणाघात
मुंबई |
आपल्या राजकीय स्वार्थासाठी प्रत्येक वेळी मराठीचा वापर करणाऱ्या ठाकरे सरकारने २०२१ च्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत दिनदर्शिकेतुन मराठी महिनेच वगळून टाकले असून, सोनिया सेनेला आता मराठी महिन्यांचा सुद्धा तिरस्कार होत असल्याची टीका भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केलेली आहे.
महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी अधिकृतपणे दिनदर्शिका प्रकाशित केली जाते, प्रत्येक वर्षी या दिनदर्शिकेत इंग्रजी महिन्यांसोबतच मराठी महिन्यांचा सुद्धा उल्लेख करण्याचा कायदा आहे. परंतु २०२१ च्या दिनदर्शिकेत मराठी महिन्यांचा उल्लेखच गाळला गेला आहे. त्यातही धक्कादायक बाब म्हणजे शिवसेनेचे नेते सुभाष देसाई मंत्री असलेल्या उद्योग विभागाच्या संकल्पनेतून ही दिनदर्शिका तयार करण्यात आली असली तरीही यात पर्यटन विभागाची प्रसिद्धी करण्यात आली आहे, त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत दिनदर्शिकेतून मराठी महिने काढून टाकण्यामागील बोलविता धनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आहेत काय? असा प्रश्न सुद्धा आमदार भातखळकर यांनी विचारलेला आहे.
मराठी शाळेत शिक्षण घेतले म्हणून मुंबई महानगरपालिकेत नौकरी नाकारणे, मराठी विद्यापीठ स्थापन करण्याला जाणीवपूर्वक उशीर करणे, मराठी शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरविणे, मुंबईतील मराठी शाळा बंद करणे अशा अनेक प्रकारांमधून ठाकरे सरकारचे व शिवसेनेचे मराठी प्रेम किती बेगडी आहे हे स्पष्ट होते, असे सुद्धा भातखळकर म्हणालेले आहेत.