“मराठीत बोलत नसल्याने माझं भाषण रोखण्यात आलं”, झेनचा शिवसेनेवर आरोप
मुंबई | महाईन्यूज |
‘जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात शिवसेना नेत्याने माझा अपमान केला. मराठीत बोलत नसल्याने माझं भाषण रोखण्यात आलं. माझ्या हातातून माइक हिसकावून घेण्यात आला’, असा आरोप राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेती झेन सदावर्तेने केला आहे. हा कार्यक्रम नेमका कुणी आयोजित केला होता व संबंधित शिवसेना नेता कोण, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
झेनच्या म्हणण्यानुसार, महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात तिला निमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात देशातील अनेक चुकीच्या गोष्टींवर तिने बोट ठेवलं. शनिवार आणि रविवारी मुलांना मध्यान्न भोजन दिले जात नसल्याबद्दची नाराजीही तिने व्यक्त केली. झेन हिंदी आणि इंग्रजीत बोलत होती. दरम्यान, झेन बोलत असतानाच व्यासपीठावर उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तिला रोखल्याचा आरोप झेनने केला आहे. ‘व्यासपीठावर उपस्थित शिवसेना महिला नेत्याला अचानक काय झाले माहीत नाही. तिने माझा अपमान होईल, असे वर्तन केले. त्याला इतरांचीही साथ मिळाली. जर भारतात राहायचे असेल तर तुला मराठी भाषा शिकावीच लागेल’, असे या नेत्याने मला खडसावले, असाही आरोप झेनने केला आहे.
दरम्यान हा शिवसेना नेता कोण होता हे समजल्यावर शिवसेना त्याच्याविरोधात काय कारवाई करेल हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.